किंमत: प्रति चौरस फूट फक्त १.८० लाख रुपये!
दक्षिण मुंबईतील जाटिया हाऊस नावाचा बंगला. जमिनीला सोन्याची किंमत असलेल्या २५,००० चौरस फुटांचा त्याचा परिसर. समुद्रकिनारी उंचवठय़ावर हा भला मोठा दुमजली बंगला. आता त्याला जोडले जाणारे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचे ते निवासस्थान असेल. तब्बल ४२५ कोटी रुपयांना (म्हणजे १,८०,००० रुपये प्रति चौरस फूट दराने) बिर्लानी त्याची खरेदी केली आहे. उल्लेखनीय म्हणजे महानगरी मुंबईतील घरांच्या खरेदी-विक्रीतील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आर्थिक व्यवहार आहे.
स्थावर मालमत्ता क्षेत्रातील व्यवहार पाहणाऱ्या जोन्स लँग लासेले (जेएलएल)च्या मध्यस्थीने पूर्ण करण्यात आलेल्या या व्यवहारासाठी बिर्ला यांनी अन्य चार स्पर्धकांना अखेर मागे टाकले. उद्योगपती व केम मॅक कंपनीचे यशवर्धन जाटिया यांच्या मालकीच्या या बंगल्यात सध्या त्यांचे पुत्र व पद्मजी इंडस्ट्रीजचे अरुण व श्याम यांचे वास्तव्य आहे. जाटिया यांनी ७० च्या दशकात एम. सी. वकील यांच्याकडून हा बंगला खरेदी केला होता. आता या बंगल्याच्या खरेदीच्या स्पर्धेत बिर्ला यांच्यासह, उद्योगपती अजय पिरामल व अन्य पाच जणांत चढाओढ सुरू होती.
एकूण ८.५ अब्ज डॉलरचे धनी स्वत: कुमारमंगलम बिर्ला हे सध्या याच परिसरातील अल्टामाऊंट रोडवरील मंगलयान या बंगल्यात राहतात. याच भागात रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांची अ‍ॅन्टिलिया ही २७ मजली बहुचर्चित इमारत आहे. अंबानी यांनी २०११ मध्ये त्यासाठी एक अब्ज डॉलर खर्च केल्याचे सांगितले जाते. समस्त स्थावर मालमत्ता क्षेत्रात आर्थिक मंदीची ओरड असताना आर्थिक राजधीनीतील नव्या व्यवहाराने पुन्हा एकदा कोटींची उड्डाणे घेतली आहेत.

श्रीमंतांची महागडी घरे
४०० कोटी रु. : २०१२ मध्ये जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदल यांनी नेपियन सी रोडवरील माहेश्वरी हाऊस खरेदी केले.
३७२ कोटी रु. : २०१४ मध्ये उद्योगपती जमशेद गोदरेज यांच्या भगिनी स्मिता कृष्णा यांनी मलबार हिलवरील भाभा बंगला खरेदी केला. (हा व्यवहार नंतर वादात सापडला.)
३५० कोटी रु. : २०१३ मध्ये पेडर रोडवरील कॅडबरी हाऊस दिलीप लाखी यांनी खरेदी केले होते.
#संलग्न सूत्रांकडून प्राप्त माहितीच्या आधारे

Story img Loader