सकाळच्या सत्रात गेल्या २० महिन्यांच्या उच्चांकाला गाठल्यानंतर शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकानी किरकोळ घसरणीसह मंगळवारच्या दिवसाची अखेर केली. एप्रिल २०११ नंतर प्रथमच १९,६०० पर्यंत गेलेला ‘सेन्सेक्स’ दिवसाच्या शेवटी मात्र २२.५५ अंश नुकसानीसह १९,३८७.१४ पर्यंत खाली येत स्थिरावला. नफेखोरी आणि घसरलेल्या निर्यातीच्या वातावरणात मुंबई निर्देशांकाने सलग तिसऱ्या दिवशी नकारात्मक धारणा दाखविली. ६,००० अंशांच्या उंबरठय़ावर असणारा ‘निफ्टी’ही ५,९६५.१५ पासून माघार घेत दिवसअखेर १०.१० अंश घट नोंदवीत बंद झाला.
गेल्या दोन दिवसांपासून घसरणाऱ्या मुंबई निर्देशांकाने सकाळच्या सत्रातच १९,५०० चा टप्पा पार केला. व्यवहाराच्या पहिल्या तासातच ‘सेन्सेक्स’ १९.६१२.१८ वर पोहोचला होता. असे करताना त्याने गेल्या २० महिन्यांनंतरचा उच्चांकी टप्पा गाठला होता. एप्रिल २०११ च्या अखेरीस बाजार या उंचीवर होता.
दोन दिवसांच्या व्यवहारात शेअर बाजाराने ७७ अंशांची घसरण दाखविली आहे. आज पहिल्या तासाभरातच निर्देशांकात तब्बल २०० अंश भर पडली. यामुळे ‘सेन्सेक्स’ने १९,५०० चा अडसर दूर सारत १९,६१२ पर्यंत मजल मारली. विशेषत: येत्या आठवडय़ातील रिझव्र्ह बँकेच्या मध्य तिमाही आढाव्यातील व्याजदर कपातीच्या आशेवर यावेळी व्याजदराशी संबंधित समभागांची खरेदी होत होती. मात्र दिवसाच्या उत्तरार्धात हा कल टिकून राहिला नाही. ४.१ टक्के घसरणीचे नोव्हेंबरमधील निर्यातीची आकडेवारी जाहीर झाली आणि नफेखोरी करीत गुंतवणूकदारांनी रिलायन्स, इन्फोसिस, टीसीएस, स्टेट बँक, भारती, भेल या आघाडीच्या समभागांची विक्रीचा सपाटा लावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा