आरोग्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव नेस्लेच्या मॅगीवर आलेले र्निबध आता अन्य कंपन्यांच्या तयार खाद्यपदार्थापर्यंतही येऊन पोहोचले आहेत. नूडल्सबरोबरच पास्ता, मॅक्रोनी  खाद्यपदार्थाचीही गुवणत्ता चाचणीचे आदेश देण्यात आले आहेत. नव्या फेऱ्यात आयटीसी, जीएसके कंपन्याही आल्या आहेत.
आरोग्यास अपायकारक पदार्थ सापडल्यावरून नेस्लेच्या मॅगीवर भारतीय अन्न सुरक्षा व दर्जा नियामकाने गेल्या आठवडय़ात तात्पुरती बंदी आणली. अनेक राज्यांनी त्याच्या विक्रीवर बंदी आणल्यानंतर नेस्ले कंपनीनेही सर्व मॅगी बाजारातून माघारी घेण्याचा निर्णय घेतला.
नियामकान विविध सात कंपन्यांच्या नूडल्स, पास्ता यांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. ३२ नाममुद्रेतील संबंधित खाद्यपदार्थाना माघारी घेण्यासह त्यांच्या उत्पादन मंजुरीविषयी शंका घेण्यात आली आहे. मॅगी, टॉप रॅमन, वाई वाई, यम्मी, फूडल्स नावाच्या या खाद्यपदार्थावर संशयाची सुई यंदा फिरली आहे. तर कंपन्यांमध्ये नेस्ले इंडियाबरोबरच आयटीसी, इंडो निस्सिन फूड, ग्लॅक्सोस्मिथक्लाईन हेल्थकेअर, सीजी फूड्स इंडिया, रुची इंटरनॅशनल व एए न्युट्रिशियन यांचा समावेश आहे. बाजारात या खाद्यपदार्थाची विक्री गैर असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट करण्यात आले आहे. या खाद्यपदार्थाची मंजुरी प्रक्रिया योग्यरीत्या पार न पडल्याचा दावा नियामकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. एस. मलिक यांनी केला आहे. हे खाद्यपदार्थ बाजारातून काढून घेऊन ते नाहीसे करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
अशा उत्पादनांना परवाने देताना त्यांच्या नमुन्यांची चाचणी करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले. नेस्लेच्या मॅगी नाममुद्रेंतर्गतच मॅगी न्युट्रिलिशिसयस पाझ्झ्टा, निस्सिनचे रॅमन आटा मसाला, आयटीसीचे तीन नूडल्स, एए न्युट्रिशियन्सचे यम्मी चिकन नूडल्स व यम्मी व्हेज नूडल्स यावर यंदा कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
उपरोक्त कंपन्यांपैकी काहींनी आपल्या खाद्यपदार्थाची योग्य चाचणी व तपासणी झाल्याचे नमूद करून त्यात आरोग्य हानीकारक काहीही नसल्याचा दावा केला आहे.
केक, मसाल्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले असून राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना १९ जूनपर्यंत अहवाल सादर करण्यास मुभा आहे.तपासणी होणारे नूडल्स..
वाय वाय नूडल्स,
भुजिया चिकन स्नॅक्स – सीजी फूडस, कोका इन्स्टंट नूडल्स,
फूडल्स निसीनचा टॉप रॅमेन आटा मसाला,
आयटीसीची तीन इन्स्टंट नूडल उत्पादने,
एए न्यूट्रीशनच्या यमी चिकन नूडल्स, यमी व्हेज नूडल्स
काय तपासण्यास सांगितले..
या उत्पादनांमधील प्रिझर्वेटिव्ह (पदार्थ जास्त काळ टिकवणारी रसायने) , कृत्रिम रंग, धातूचे प्रमाण (शिसे, तांबे, आर्सेनिक व कॅडमियम) तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वॉचडॉग फाउंडेशनकडून
गुन्हा दाखल
नेस्ले इंडियाच्या प्रमुखांसह ९ अधिकारी व मॅगीची जाहिरात करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित व प्रीती झिंटा या सदिच्छादुतांवरोधात वॉचडॉग फाउंडेशनने मुंबईत गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader