युनियन बँकेच्या समभागाचे मूल्य दशकाच्या नीचांक पातळीवर
कर्ज घोटाळा प्रकरणात तक्रार दाखल करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला शुक्रवारी भांडवली बाजारात मोठा समभागमूल्य फटका बसला. एकाच व्यवहारातील पाच महिन्यांचा सत्र तळ गाठणाऱ्या मुंबईच्या शेअर बाजारात युनियन बँकेचा समभाग सप्ताहअखेर ८.२९ टक्क्यांनी रोडावत ८६.८५ या गेल्या तब्बल ११ वर्षांच्या तळात विसावला.
युनियन बँकेच्या पुढाकाराने विविध आठहून अधिक बँकांनी गुरुवारी टॉटेम इन्फ्रास्ट्रक्चरविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. सुमारे १,३९४.४३ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाबाबत हैदराबादस्थित माहिती तंत्रज्ञान कंपनीविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.
मुंबई शेअर बाजार दफ्तरी युनियन बँकेचा समभाग सत्रात ८६.०५ पर्यंत घसरताना त्याच्या वर्षभराच्या किमान स्तरावरही येऊन ठेपला होता. सत्रात त्याने तब्बल ९ टक्क्यांपर्यंतची आपटी अनुभवली.
बँकेच्या समभागाचे यापूर्वीचे किमान मूल्य ८ मार्च २००७ रोजी होते. वर्षभरात यूनियन बँकेचा समभाग ४० टक्क्यांनी घसरला आहे, तर सेन्सेक्समधील या दरम्यानची घसरण ४ टक्क्यांची नोंदली गेली आहे.
पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदीविरोधात केलेल्या फसवणूक तक्रारीनंतर युनियन बँकेने केलेली तक्रार रक्कम ही आतापर्यंतची मोठी मानली जाते. स्टेट बँकेसह १३ बँकांनी चेन्नईस्थित कनिष्क गोल्डविरुद्ध ८२४.१५ कोटी रुपयांच्या कर्जथकिताचे प्रकरणही तपास यंत्रणांकडे नोंदविले आहे.