६८,००० कोटी रुपये मालमत्तेच्या समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांना शुक्रवारी सकाळीच अटक झाल्याचे वृत्त पसरताच भांडवली बाजारातील सहारा समूहाशी संबंधित दोन्ही कंपन्यांचे समभाग मूल्य आपटले. दूरचित्रवाहिन्या चालविणाऱ्या सहारा वन मीडिया अॅण्ड एन्टरटेनमेन्टचा समभाग दिवसअखेर २.९९ टक्क्यांनी घसरत ६०.१० रुपये या दिवसाच्या नीचांकावर आला, तर समूहाची गृहवित्त कंपनी असलेल्या सहारा हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचा समभाग व्यवहारत ३७ रुपयांपर्यंत खाली येत दिवसअखेर ०.६५ टक्के घसरणीसह ३८.४५ रुपयांवर स्थिरावला. दरम्यान रॉय यांना शुक्रवारी सकाळी अटक झाल्यानंतर समूहाने जारी केलेल्या दोन पानी प्रसिद्धीपत्रकात सेबीवरच आरोप करण्यात आले आहेत. सेबीच्या २० हजार कोटी थकल्याच्या दाव्याचा समूहाने इन्कार केला आहे.
* प्रसारमाध्यमातील मित्र, नातेवाईक यांच्याकडून माझे कार्यालयीन सहकारी, माझे मित्र, माझे कौटुंबिक सदस्य यांना सातत्याने दूरध्वनी व एसएमएस संदेश येत आहेत. त्यांना माझ्याकडून उत्तर हवे आहे. त्या सर्वाना मी आता एवढेच सांगू इच्छितो की, माझा देश मला माझा सन्मान नक्कीच मिळवून देईल.
* सुब्रतो रॉय, सहारा समूहाचे अध्यक्ष
प्रत्येक वेळी आम्ही अधिक शक्तीनिशी उभे राहिले आहोत. सुब्रतो हे माझ्यासाठी केवळ एक वडीलच नाही तर ते समस्त देशासाठी एक खरे देशभक्त आहेत. देशासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. आज अशाप्रकारे त्यांचा अपमान होताना मला अतिव दु:ख होत असून मला आता सहकार्य, पाठिंब्याची गरज आहे.
* सीमान्तो सुब्रतो रॉय, सुब्रतो रॉय यांचे पुत्र