निर्देशांकांत नाममात्र वाढ करणारे बुधवारी बाजारात झालेल्या व्यवहारात रेल्वेशी संबंधित समभागांचे मूल्य सपाटून खालावले. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे गुरुवारी रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत.
मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी घसरण रोखली. मात्र बुधवारी दोन्ही प्रमुख निर्देशांक अनुक्रमे ३.३३ व ५.१५ अंशच केवळ वाढू शकले. केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशीच बाजारातील महिन्यातील वायदापूर्तीचा अखेरचा दिवस आहे. तर शनिवारी मुख्य अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी बाजार नियमित सुरू राहणार आहे.
मुंबई शेअर बाजारात रेल्वे क्षेत्राशी संबंधित समभागांचे मूल्य ६ टक्क्यांपर्यंत घसरले. यामध्ये टिटागढ व्हॅगन्स (-६.१९%), केर्नेक्स मायक्रोसिस्टिम्स (-५.००%), हिंद रेक्टिफायर्स (-१.०१%), टेक्समॅको रेल अॅन्ड इंजिनीअरिंग (-२.९०%), बीएएमएल (-०.५०%) यांचा समावेश राहिला. तर कालिंदी रेल निर्माण आणि स्टोन इंडिया हे अनुक्रमे १.१५ व ०.५९ टक्क्याने उंचावले.
रुपया २३ पैशांनी उंचावला
मुंबई : गेल्या अनेक सत्रांपासून सातत्याने घसरत ६२ च्याही तळात आलेला रुपया बुधवारी एकाच व्यवहारात तब्बल २३ पैशांनी उंचावला. डॉलरच्या तुलनेत त्याने ६२ च्या वरचा, ६१.९७ असा गेल्या तीन आठवडय़ांतील सर्वोच्च स्तर गाठला. स्थानिक चलनातील ही सलग दुसरी भक्कमता नोंदली गेली. दोन दिवसांनी येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पातील आर्थिक सुधारणांच्या आशेवर विदेशी संस्था गुंतवणूकदारांनी केलेल्या भांडवली बाजारातील निधीओघाचाही हा परिणाम राहिल्याचे मानले जाते.