विदेशी गुंतवणूक मर्यादा विस्तारानंतर भारतीय हवाई क्षेत्रात पंख पसरू पाहणाऱ्या एअर-आशियाने नोकरभरतीही सुरू केली असून कंपनीचा मुख्याधिकारीदेखील निश्चित केला आहे. मलेशियातील आघाडीची प्रवासी हवाई वाहतूक कंपनी असलेल्या एअर-आशियाने टाटा समूहातील टाटा सन्सबरोबर भारतीय हवाई क्षेत्रात स्वारस्य दाखविले आहे. यामध्ये टेलस्ट्रा ट्रेडप्लेसचाही हिस्सा असेल.
एअर-आशिया येत्या मे महिन्यापासून भारतात देशांतर्गत उड्डाण करण्यास सज्ज असेल, अशी चर्चा आहे. एअर आशिया समूहाचे मुख्य कार्यकारी टोनी फर्नांडिस यांनी आज ट्विटरवरून ‘मी एअरआशिया इंडियासाठी मुख्याधिकारी निवडला आहे’ असे भाष्य केले. भारतातील आपल्या कंपनीचे पुढारपण करणारी ही व्यक्ती कोण असेल हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र ती दक्षिणेतील (चेन्नई) असून अत्यंत तरुण आहे, एवढेच त्यांनी ट्विट केले आहे.
नव्या भारतीय हवाई कंपनीचे मुख्यालय चेन्नईतच असेल, असेही एअरआशियाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. एअरआशिया भारतातील विविध निमशहरे हवाई सेवेद्वारे जोडण्याच्या प्रयत्नात आहेत. यानुसार कंपनीला मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळही लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाबरोरच कंपनी वैमानिक, अभियंते, विमानातील कर्मचारी, तिकिट नोंदणीसाठीचे मनुष्यबळ यावरही आता लक्ष केंद्रीत करेल.
दरम्यान, एअरआशिया आणि टाटा समूह यांच्या भागीदारीतील हवाई वाहतूक व्यवसायावर विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ उद्या चर्चा करण्याची शक्यता आहे. टाटाबरोबर ४९ टक्के हिश्श्यासह भागीदारीतील व्यवसायासाठी मंडळाकडे यापूर्वीच कंपनीने अर्ज केला आहे. भारतीय हवाई क्षेत्र विदेशी गुंतवणुकीसाठी सप्टेंबर २०१२ मध्ये खुले केले गेल्यानंतर एअरआशियाच्या माध्यमातून त्याला मिळालेला हा पहिला प्रतिसाद आहे. याबाबत जेट आणि दुबईची इतिहाद कंपनी दरम्यानच्या व्यवहाराची अद्याप चर्चाच सुरू आहे.