जेट आणि इतिहाद एअरवेज यांच्या दरम्यान बुधवारी मार्गी लागलेला २,०६० कोटींच्या थेट विदेशी गुंतवणुकीचा सौदा हा देशातील हवाई प्रवासी आणि एकूण नागरी उड्डाण क्षेत्राला उपकारक ठरेल, अशी अनुकूल प्रतिक्रिया केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अजित सिंग यांनी व्यक्त केली. मात्र यातून स्पर्धेला तोंड फुटेल आणि त्याची झळ एअर-इंडियाला बसेल, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.
संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना सिंग म्हणाले की, या सौद्यातून देशाच्या हवाई क्षेत्रात स्पर्धेला चालना मिळेल आणि कोणत्याही उद्योगक्षेत्रासाठी स्पर्धा ही फायद्याचीच असते. तथापि राष्ट्रीय हवाई कंपनी ‘एअर इंडिया’ला आपला कारभार अधिक तत्पर बनवून, दक्ष बनावे लागेल, असे त्यांनी सुचविले.
अधिक विस्ताराने मतप्रदर्शन करताना ते म्हणाले की, एअर इंडियाची विदेशातील उड्डाणे खूपच मर्यादित आहेत. जर अधिकाधिक भारतीयांना विदेशात उड्डाणे घ्यावयाची असतील तर त्यांच्यासाठी नव्या हवाई कंपन्या येणे हाच पर्याय दिसून येतो. प्रवाशांची ही गरज भागविण्यासाठी ‘एअर इंडिया’नेही सुसज्जता करावी. आपण मात्र कोणाही एका हवाई कंपनीचा विचार करून निर्णय घेत नसतो, असे सिंग यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा