भारतात निर्माण झालेल्या गुंतवणूकपूरक वातावरणाचा लाभ घेण्याचा मोह पुन्हा एकदा एअर सेशेल्स या विदेशी हवाई कंपनीला झाला असून इबोलामुक्त पूर्व आफ्रिकेच्या सेशेल्स बेटवजा देशामध्ये सफर घडवून आणण्याचा इरादा जाहीर करण्यात आला आहे.
संयुक्त अरब अमिरातेतील इतिहादचा ४० टक्के भागीदारी हिस्सा असलेल्या एअर सेशेल्सद्वारे मुंबईतून सेशेल्स या पर्यटन बेटावर आठवडय़ातून तीन वेळा उड्डाणे करण्याचा मानस कंपनीने बुधवारी व्यक्त केला. चार तासांच्या या प्रवासासाठी कंपनीने एअरबसचे ए ३२० जातीचे विमान सज्ज ठेवले आहे.
९० लाख लोकसंख्या असलेले सेशेल्स हे बेट पूर्व आफ्रिकेच्या नजीक असून पर्यटकांची पसंती असलेल्या मॉरिशसपासून ते काही सागरी मैलांवरच आहे. हनिमून पर्यटनासाठी ओळखले जाणाऱ्या या बेटावर निसर्गसंपन्नता आहे, अशी माहिती ‘सेशेल्स हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड टुरिझम असोसिएशन’चे अध्यक्ष फ्रेडी करकारिया यांनी दिली.
एअर सेशेल्सने २०१२ मध्ये भारतात अंशत: हवाई सेवा देऊ केली होती. मात्र बिकट आर्थिक वातावरणात माघार घेण्यात आली. कंपनी आता पुन्हा भारतीय हवाई क्षेत्रातील संधी हेरण्यास उत्सुक असून यापुढे आम्हाला सकारात्मक तसेच वाढीचा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास यानिमित्ताने एअर सेशेल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज पापा यांनी व्यक्त केला. सेशेल्स पर्यटन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन निकेम यांनीही पर्यटनासाठी चीनच्या तुलनेत भारतीयांकडून अधिक अपेक्षा असल्याचे या वेळी सांगितले.
वाढते इंधन दर, इबोलाचे संकट आदी अडथळे सेशेल्ससमोरून आता नाहीसे झाले असून भारत, चीनसह युरोपीय देशांचा पर्यटन म्हणून या देशाला यापुढेही प्राधान्य राहील, असा विश्वास निकम यांनी व्यक्त केला. वर्षांला २ हजार पर्यटक भेट देणाऱ्या सेशेल्समध्ये युरोपातील फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटनच्या नागरिकांची संख्या अधिक असते. २०१३ मध्ये भारत व सेशेल्सदरम्यान ५.३७ कोटी डॉलरच्या व्यापार उलाढाल नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा