करदात्याकडून अतिरिक्त करभरणा झाला असल्यास, परतावा (रिफंड) मिळविण्यासाठी केलेल्या दाव्याची प्रक्रिया सत्वर पूर्ण करून रिफंडची रक्कम थेट करदात्याच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत प्राप्तिकर विभागाने गंभीरतेने प्रयत्न सुरू केले आहेत. नियमित कर विवरणपत्र दाखल करणाऱ्या करदात्यांसाठी ही आनंदाची बातमी असून, रिफंडसाठी वर्षांनुवर्षे वाट पाहत बसण्याचा त्यांचा जाच कमी होणार आहे.
अगदी ५०,००० रुपयांपेक्षा अधिक रिफंड रक्कमही धनादेशाद्वारे टपाल सेवेच्या माध्यमातून करदात्याला पाठविण्याच्या प्रथेला खंड पाडून, पूर्णपणे बँकिंग सेवेचा वापर याकामी करण्याचा प्राप्तिकर विभागाने निर्णय घेतला असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षा अनिता कपूर यांनी सांगितले.
या संबंधाने वाणिज्य बँका आणि रिझव्‍‌र्ह बँकेशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि बँकांमध्ये नाव नव्हे तर केवळ खाते क्रमांक तपासण्याची पद्धत असल्याने, करदात्याच्या नावानुरूप त्याच्या खात्यात रक्कम जमा करणे अडचणीचे व प्रसंगी त्या करदात्यासाठी तापदायक ठरू शकते, अशी रिझव्‍‌र्ह बँकेने उपस्थित केलेला मुद्दाही रास्त असल्याचे कपूर यांनी सांगितले. करदात्याच्या नावासह बँकेतील खाते क्रमांकही जुळवून व वैधतेची छाननी करून रिफंड धाडण्याच्या प्रक्रियेवर काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader