गहाण ठेवलेल्या सोन्याच्या मूल्याच्या ६० टक्क्यांऐवजी ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज वितरण करण्याला रिझव्‍‌र्ह बँकेने सोने तारण कर्ज क्षेत्रातील बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी खुली केली आहे. या अनुकूल निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर गुरुवारी शेअर बाजारात या क्षेत्रातील मुथ्थूट फायनान्स आणि मन्नपूरम फायनान्स या कंपन्यांच्या समभाग मूल्यांनी २० टक्क्यांचे वरचे सर्किट गाठले.
रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी सायंकाळी बिगरबँकिंग वित्तीय संस्थांकडून सोन्याचे दागिने तारण ठेवून दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा सध्याच्या दागिन्यांच्या मूल्याच्या ६० टक्क्यांवरून ७५ टक्के इतकी वाढविण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. वित्तीय संस्थांकडून वितरित सोने तारण कर्जाचे प्रमाण वाजवी पातळीवर आल्याने सदर निर्णय घेत असल्याचे मध्यवर्ती बँकेने सांगितले.
गेल्या वर्षी सोने आयातीत झालेली विलक्षण वाढ आणि परिणामी परराष्ट्र व्यापारातील तूट फुगत असताना, रिझव्‍‌र्ह बँकेने सोने तारण कर्जाच्या मर्यादेत कपातीचा निर्णय जाहीर केला. सोने तारण कर्जाच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांत झालेली वाढही रिझव्‍‌र्ह बँकेसाठी चिंतेची बाब होती. परंतु प्रत्यक्षात अनेक कुटुंबांकडे पिढीजात पडून असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या मालमत्तेचा सोने तारण कर्ज हा खऱ्या अर्थाने उत्पादक वापर आहे, असे नमूद करीत गोल्ड लोन कंपन्याही कर्जमर्यादेवर आलेली बंधने सैल करण्याची मागणी करीत होत्या.
रिझव्‍‌र्ह बँकेकडून या मागणीला अनुकूल प्रतिसाद मिळाल्याने गुरुवारी शेअर बाजाराच्या प्रारंभीच मुथ्थूट फायनान्सच्या समभागाने भावात वाढीसाठी कमाल अनुमती असलेला (अप्पर सर्किट) २० टक्क्यांचा स्तर गाठून १२९.१० रुपयांवर मजल मारली. मन्नपुरम फायनान्सही १९.८० टक्क्यांनी उसळला आणि दिवसअखेर १८.१५ रुपये या भावावर स्थिरावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा