वृत्तसंस्था, नवी दिल्ली : जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझॉनच्या बाजारमूल्यात १ लाख कोटी डॉलरची घट झाली आहे. वाढती महागाई आणि त्यावर उपाय म्हणून जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून वाढविले जाणारे व्याजदर आणि कंपनीच्या निराशाजनक कामगिरीमुळे गुंतवणूकदारांनी चालू वर्षांत अमेझॉनच्या समभागांची तुफान विक्री केली.
बुधवारच्या सत्रात अमेरिकी भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी अमेझॉनच्या समभागात विक्रीचा सपाटा लावल्याने समभाग मूल्य ४.३ टक्क्यांनी घसरले. परिणामी कंपनीचे बाजार मूल्य जुलै २०२१ मधील १.८८ लाख कोटी डॉलर (१.८८ ट्रिलियन डॉलर) या विक्रमी पातळीवरून सुमारे ८७,९०० डॉलपर्यंत खाली आले आहे. जागतिक पातळीवर मंदीच्या धसक्याने गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याने त्याची सर्वाधिक झळ तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना बसली. अमेरिकी भांडवली बाजारातील आघाडीच्या पाच तंत्रज्ञान कंपन्यांनी चालू वर्षांत एकत्रित ४ लाख कोटी डॉलरचे बाजारभांडवल गमावले आहे.
करोना काळानंतर लहान दुकाने आणि किराणा व्यावसायिक पुन्हा सक्रिय झाल्याने ऑनलाइन विक्री घटली आहे. एकूणात, मंदावलेली विक्री, महागाईमुळे वाढता खर्च आणि व्याजदरातील झालेल्या वाढीमुळे चालू वर्षांत अमेझॉनच्या समभाग मूल्यात ५० टक्क्यांहून अधिक घसरण झाली. चालू वर्षांत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची संपत्ती सुमारे १०९ अब्ज डॉलरवरून कमी होत ८३ अब्ज डॉलरवर गडगडली आहे.