मुंबई : अमूल या नाममुद्रेने संपूर्ण देशभरात दूध व दुग्धजन्य उत्पादनांची विक्री करणाऱ्या गुजरात सहकारी दूध पणन महासंघाने मंगळवारपासून (१ मार्च) दूधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ लागू केली आहे.
या दरवाढीनंतर, मुंबईच्या बाजारपेठेत अमूल गोल्ड दूध अर्धा लिटरसाठी ३० रुपये, अमूल ताजा अर्धा लिटरसाठी २५ रुपये आणि अमूल गाईचे दूध हे अर्धा लिटरसाठी २६ रुपये या किमतीत उपलब्ध होईल. ताजी दोन रुपयांची दरवाढ म्हणजे विक्री किमतीतील सरासरी ४ टक्क्य़ांची वाढ ठरते, जी सध्या अन्नधान्य महागाई दराच्या तुलनेत खूपच कमी असल्याचा दावा महासंघाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. मागील दोन वर्षांत ताजे दूध उत्पादन वर्गवारीत अमूलच्या किमती वार्षिक ४ टक्के दरानेच वाढल्या आहेत.
इंधन आणि विजेच्या किमतीतील वाढ, परिणामी पॅकेजिंग, वाहतूक खर्चातील वाढ, पशुखाद्याच्या किमतीतील वाढीमुळे एकूण खर्च वाढल्याने दूध दरवाढ केली गेल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खरेदी किमतीत आधीच ५ टक्क्य़ांची वाढ केली गेली असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.