चांगले पीकपाणी, सावरलेला रुपया आणि उंचावलेला शेअर बाजार अशा तिहेरी अनुकूलतेमुळे तूर्तास गोडावलेल्या अर्थव्यवस्थेला रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्याज दरवाढीच्या रुपात ‘कडू गोळी’ दिली. अनुकूल वातावरणामुळे राजन आपल्या पहिल्याच पतधोरणात रेपो दरांत कपात करतील, अशी अपेक्षा असताना त्यात पाव टक्क्याची वाढ करत राजन यांनी साऱ्यांनाच चकीत केले. दिर्घकालिन महागाईला आवर घालण्याचा प्रयत्न राजन यांनी केला असला तरी या निर्णयामुळे व्याजदर वाढणार असल्याने नजीकच्या काळात गृह व वाहन कर्जे महागण्याची चिन्हे आहेत.
राजन यांनी महिन्याच्या सुरुवातीला रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉलरच्या तुलनेत ७० पर्यंत घसरलेला रुपया सावरला. त्यामुळे व्याजदराबाबत संवेदनशीलता दाखवत ते सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा होती. अमेरिकन फेडरल रिझव्र्हनेही गुरुवारी भारताला पोषक ठरू शकेल असाच कौल दिला होता. त्यामुळे व्याजदर कपात झाली नाही तरी ती वाढणार नाही, अशी अटकळ बांधण्यात येत होती. परंतु राजन यांनी सर्वच अटकळींना धक्का देत वाणिज्य बँकांसाठीचे अल्प मुदतीचे कर्ज अर्थात रेपो दर पाव टक्क्यांनी महाग केले. त्यामुळे ३ एप्रिलपासून सव्वा सात टक्क्यांवर असलेला रेपोदर आता ७.५० टक्के झाला आहे.
महागाईविरोधात पवित्रा घेणे हाच आमचा हेतू आहे..पण रेपो दरांतील वाढ विकासविरोधी असल्याचा संबंध जोडणे चुकीचे आहे. कारण महागाई कमी होण्याचा विश्वासही विकासाला चालना देऊ शकतो..
आधी दिल्या गेलेल्या इशाऱ्याचा विसर पडू देऊ नका आणि उत्सवाची घाईही करू नका. कारण हे पुन्हा घडणारच आहे आणि तो वार पुन्हा येण्याआधी आपण आपली घडी नीट बसवून घ्यायला हवी.
रेपो दरांत वाढ झाल्याने गृह व वाहन कर्ज महागण्याची दाट शक्यता आहे. मात्र, रिझव्र्ह बँकेकडून सर्व बँका ज्या दराने अल्पावधीसाठी कर्ज घेतात तो दर एमएसएफ पाऊण टक्क्याने कमी करण्यात आला आहे. यामुळे बँकांची रोकड चणचण कमी होणार आहे. तसेच बँकांना दैनंदिन रोख राखीव प्रमाण (सीआरआर) दोन टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा