देशातील संरक्षण क्षेत्रात उद्योगपती अनिल अंबानी यांचा रस वाढत आहे. नौदलासाठी तयार करण्यात येणाऱ्या जहाजांकरिता अधिक गुंतवणूक करण्याचा मनोदय अंबानी यांनी व्यक्त केला आहे. संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीवर महिंद्र, टाटा या उद्योग समूहांनी यापूर्वीच भर दिला आहे. अंबानी यांनी गुजरातच्या पिपावाव डिफेन्समध्ये काही दिवसांपूर्वीच मोठा हिस्सा खरेदी केला होता.
पिपावाव शिपयार्ड ही नौदलासाठी जहाजे तयार करण्याचे काम करते. त्यात येत्या काही वर्षांमध्ये आणखी ५,००० कोटी रुपये गुंतविण्यात येईल, असे अंबानी यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठीच आपण ही गुंतवणूक करत असल्याचे अंबानी यांनी म्हटले आहे. संरक्षण क्षेत्रातील पारदर्शक व्यवहार तसेच स्पर्धात्मक वातावरणासाठी संधी असल्याचेही ते म्हणाले. खासगी क्षेत्रातील विश्वास वाढविण्यासाठी व्यवसाय पूरक धोरणाला चालना देण्याची गरजही त्यांनी मांडली.
‘सीआयआय’ने आयोजिक केलेल्या संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योजक यांच्या राजधानीतील एका बैठकीदरम्यान अंबानी यांनी समूहाने १०,००० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असलेल्या पिपावाव डिफेन्सची खरेदी केल्याचे निदर्शनास आणले. या क्षेत्रात आपल्याला भविष्यात अधिक गुंतवणूक करायची आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
पिपावावच्या गुजरातमधील प्रकल्पाचा उल्लेख करत त्यांनी जहाज बांधणीसाठी हे ठिकाण जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यात येईल, असा शब्द यावेळी उपस्थितांना दिला. भारतीय नौदलाला आवश्यक अशा जहाजांची बांधणी करण्यासाठी ही जागा क्षमतापूर्ण असल्याचेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा