खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या फेडरल बँकेच्या अ-कार्यकारी अध्यक्षपदी सुरेश कुमार तर अतिरिक्त संचालकपदी डॉ. के. एम. चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर २००५ पासून बँकेच्या संचालक मंडळावर असणाऱ्या सुरेश कुमार यांची कारकिर्द दोन वर्षांसाठी असेल. फेडबँक फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे कार्यकारी अध्यक्षही ते राहिले आहेत. गेल्या गणराज्यदिनी ‘हिंद रतन’ने सन्मानित सुरेश कुमार आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे संचालक राहिले आहेत. तर डॉ. चंद्रशेखर यांचा कालावधी तीन वर्षांसाठी असेल. माजी केंद्रीय कॅबिनेट सचिव राहिलेले चंद्रशेखर यांनी केरळ नियोजन मंडळाचे उपाध्यक्षपदही भूषविले आहे. जागतिक व्यापार संघटना, जी-२० परिषदातही त्यांचा समभाग राहिला आहे. प्रशासकीय अधिकारी राहिलेले चंद्रशेखर यांनी विविध शासकीय स्तरावर महत्त्वाची पदे राखली आहेत.
हॅथवे केबलच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जगदिश कुमार
केबल जोडणीच्या माध्यमातून देशातील प्रसार माध्यम क्षेत्रात आघाडीचे स्थान राखणाऱ्या हॅथवे केबल अ‍ॅण्ड डाटाकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जगदिश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर के. जयरामन यांचे नाव कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. उभय नियुक्त्या २१ डिसेंबर २०१२ पासून कार्यान्वित झाल्या आहेत. सीए असणाऱ्या जगदिश कुमार यांचा २५ वर्षांच्या व्यावसायिक अनुभव आहे. त्यांनी आयटीसी, स्टार टीव्ही (भारत तसेच हॉंगकॉंगमध्ये), रिलायन्स इंडस्ट्रीज (अध्यक्ष-माध्यम आणि मनोरंजन) सारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्येही महत्त्वपूर्ण जबाबदारी हाताळली आहे. देशात डिजिटायझेशनची टप्प्यामध्ये अंमलबजावणी सुरू असताना जगदिश कुमार यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. हॅथवेने पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली आणि कोलकत्त्यात येथे ही यंत्रणा राबविली आहे. कंपनी आता मार्च २०१३ पर्यंत दुसऱ्या टप्प्यात अन्य शहरांमध्ये हे अत्याधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे.
भारतीय इंटरनॅशनलचे अतिरिक्त संचालक व्ही. के. चोप्रा
भारतीय समूहातील भारतीय इंटरनॅशनल लिमिटेड या फॅशन क्षेत्रातील कंपनीच्या अतिरिक्त संचालकपदी व्ही. के. चोप्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेबी या भांडवल बाजार नियामक संस्थेचे पूर्ण वेळ सदस्य राहिलेले चोप्रा यांनी ३१ डिसेंबर २०१२ पासून नव्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. बँक आणि नियामक क्षेत्रातील चार दशकातील अनुभव असणाऱ्या चोप्रा यांनी राष्ट्रीयीकृत कॉर्पोरेशन बँक तसेच सिडबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळले आहे. कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष स्नेहदीप अगरवाल यांनी चोप्रा यांना नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय इंटरनॅशनल ही कंपनी गेल्या दीड दशकापासून फॅशन या क्षेत्रात आहे. ‘ाुगो बॉस, झारा, लेविस, मॅन्गो, ग्युस, व्रॅन्गलरसारख्या ६० हून अधिक जागतिक ब्रॅण्डसाठी कंपनी आपली वस्त्र तसेच चर्म उत्पादने पुरविते. कंपनीचा मिलान येथे डिझाईन स्टुडिओ आहे.
मदुराईच्या जोसेफिन सेल्वराज पुरस्काराने सन्मानित
इंडियन र्मचट्स चेंबरच्या महिला विभागातर्फे दिला जाणारा २०१२ चा जानकीदेवी बजाज पुरस्कार मदुराईच्या जोसेफिन सेलवराज यांना प्रदान करण्यात आला. जाहिरात आणि रंगमंच तसेच सामाजिक कार्यकर्ते गर्सन कुन्हा यांच्या हस्ते प्रसिद्ध अभिनेत्री नंदिता दास यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण भारतात केलेल्या उल्लेखनीय उद्यमशील कार्याबद्ल दिला जाणारा यंदाचा हा २० वा पुरस्कार ‘विबिस नॅचरल बी फार्म’च्या संस्थापिका जोसेफिन यांना जाहीर झाला. प्रत्येक घरात मधुबीज घरटे रुजवावे, हिच माजी इच्छा आहे, असे मनोगत यावेळी जोसेफिन यांनी व्यक्त केले. यासाठी प्रसंगी मोफत प्रशिक्षण देण्याचीही माजी तयारी आहे, असेही त्या म्हणाल्या. चेंबरच्या महिला विभागाच्या अध्यक्षा दर्शना जोशी याही यावेळी उपस्थित होत्या.
युनियन बँकेचे डी. सरकार ‘बँकर ऑफ द इयर’ने सन्मानित
राष्ट्रीयीकृत युनियन बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डी. सरकार यांना नुकतेच ‘बँकर ऑफ द इयर’ने गौरविण्यात आले. ‘स्कॉच कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस’च्या वतीने वित्तीय सर्वसमावेषकतेच्या कार्यासाठी हा सन्मान करण्यात आला आहे. याच कार्यक्षेत्रात बँकेला ‘इंडियन बँक असोसिएशन’ या बँक व्यवस्थापकांच्या संघटनेनेही उत्कृष्ट बँक म्हणून २०१२ चा पुरस्कार दिला होता. सरकार यांना पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार व रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांच्या हस्ते दिल्लीत यंदाचा गौरवण्यात आले. ‘स्कॉच समूहा’चे अध्यक्ष समीर कोचर, यूनियन बँकेचे दिल्लीतील एस. पी. गोयल आदी यावेळी उपस्थित होते. वित्तीय सर्वसमावेषकतेच्या अंतर्गत बँकेने १.२ कोटी ग्राहक जोडले आहेत. स्मार्ट कार्ड आणि जनाधार रुपे कार्डच्या धर्तीवर बँकेने हे कार्य केले आहे. बँक आधार कार्ड वितरण योजनाही आपल्या विविध शाखांमधून राबवित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा