एखाद्या व्यक्तीच्या पतविषयक इतिहासाची सूची म्हणजे ‘सीआयबीआयएल स्कोअर’ अर्थात ‘सिबिल गुणांक’ होय. कर्जदारांना त्यांच्या कर्जविषयक अर्जाचे मूल्यांकन आणि मंजुरीसाठी हा गुणांक खूपच मदतकारक ठरतो. चांगला पत गुणांक हा पात्रतेच्या काही महत्त्वपूर्ण निकषांपैकी एक असतो, ज्याच्या आधाराने बँक कर्ज प्रदान करते.
वर म्हटल्याप्रमाणे, पत गुणांक हा व्यक्तीच्या पतविषयक इतिहासाचा निर्देशक आहे. सिबिल पत गुणांक अहवाल हा सध्या असलेली कर्जे आणि क्रेडिट कार्ड, कर्जे आणि क्रेडिट कार्डची बिले भरण्यातील तत्परता व परिश्रम, एकूण कर्ज संख्या आणि क्रेडिट कार्डासाठी सादर केलेले अर्ज, उशिराने भरणा केलेल्या आणि हप्तेच न भरले गेल्याच्या नोंदी आदींचा इत्थंभूत तपशील असलेला लेखाजोखाच असतो.
सिबिल पत गुणांक मिळविणे, खासकरून कर्जाच्या मंजुरीच्या वेळी अतिशय महत्वाचे असतात. या पत अहवालात कर्जाच्या इतिहासाची आणि त्याच्या परताव्याच्या पद्धतीची सविस्तर माहिती दाखवली जाते. व्यक्तिगत कर्जदाराची ही पूर्वपीठिका कर्जदात्या बँका आणि वित्त संस्था ‘क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लि. अर्थात सिबिल’मार्फत तपासतात. यामुळे कर्जदाराच्या पात्रतेच्या निश्चितीस त्यांना मदत मिळते. तसेच कर्जदाराला एकंदर प्रक्रिया गतिमान बूनन अधिक जलद गतीने आणि सहजपणे कर्ज मिळविता येते.
सिबिल पत गुणांक कर्जदात्या बँक-वित्तसंस्थेवर प्रथमदर्शनी पसंतीच्या प्रभावासारखे काम करते. जेवढा जास्त गुणांक तेवढी कर्ज मंजुरीची शक्यता जास्त असते. त्यामुळे पत गुणांकावर लक्ष ठेवणे, खासकरून जर एखाद्या व्यक्तीला भविष्यात कधीही कर्ज घ्यायचे असल्यास अतिशय महत्त्वाचे असते.

पत गुणांक सुधारता येणे शक्य आहे..
सिबिल पत गुणांक विविध प्रकारे सुधारता येऊ शकतो. केवळ काही गोष्टींबद्दल दक्षता पाळावी लागेल.

– तुमची देणी वेळेवर किंवा वेळेआधी द्यावीत. उशिरा केलेला भरणा कर्जदात्या बँक अथवा वित्तसंस्थेद्वारे नकारात्मकतेने पाहिला जातो.
– तुमच्या कर्जाला आणि पतविषयक गरजांना वास्तविक पातळीवर ठेवा. जेव्हा खरोखरीच निकड असेल तेव्हाच कर्ज घ्या. शक्य तो आवश्यक असलेली रक्कम इतर स्रोतांतून मिळेल काय हे पाहावे.
– सुरक्षित कर्ज (उदा. गृहकर्ज, वाहनकर्ज) आणि असुरक्षित कर्ज (उदा. व्यक्तिगत कर्ज, क्रेडिट कार्ड्स) यांचे योग्य संमिश्रण ठेवावे. अनेक प्रकारची असुरक्षित कर्जे नकारात्मकरीत्या पाहिली जाऊ शकतात.
– कर्ज खाते संयुक्त स्वरूपाचे असल्यास, स्वत:सह संयुक्त खातेदाराकडूनही चूक घडणार नाही, याची काळजी घ्या. कारण त्यामुळे तुमच्या स्वत:च्या खात्यामध्ये हप्ता न भरल्याची नोंद तुमच्या पत गुणांकावर विपरीत परिणाम करू शकते.
– जर तुमचे व्यक्तिगत कर्ज खाते किंवा क्रेडिट कार्ड नोदींमध्ये चुका असतील तर बँकेशी त्वरित संपर्क करा आणि चूक दुरुस्त केल्याची खात्री करून घ्या; नाही तर तुमची कोणतीही चूक नसताना तुमच्या पत गुणांकावर परिणाम होईल.
– कर्जाचे अर्ज फेटाळले जाण्याचा अप्रिय धक्का टाळण्यासाठी वेळोवेळी तुमचा ‘सिबिल रिपोर्ट’ मिळवा.

– कल्पेश ओझा

(लेखक, अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि.चे मुख्य वित्तीय अधिकारी आहेत. अस्पायार ही मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस लिमिटेडची उपकंपनी आहे.)