* सुधीर जोशी

अर्थसाहाय्याच्या अपेक्षेत असणाऱ्या उद्योगांना व बाजाराला आठवडाभर झुलवत ठेवले ते मंगळवारच्या २० लाख कोटींच्या घोषणेने. अपेक्षांच्या लाटेवर स्वार झालेल्या बाजाराने बुधवारी उसळी घेतली. बाजार संपल्यावर सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठीच्या घोषणेत बाजारावर प्रभाव पाडणारे काहीच नव्हते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी बाजाराचे निर्देशांक खाली आले. गुरुवारी अर्थमंत्र्यांनी फेरीवाले, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांना सवलतीच्या दरात कर्जे उपलब्ध करण्याची व पंतप्रधान आवास योजनेला मुदतवाढ देण्याची घोषणा केली. बाजाराने त्याकडेही दुर्लक्ष केले. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्समध्ये ५४५ अंकाची तर निफ्टीत ११५ अंकांची घट झाली.

टाळेबंदीच्या काळात घरात बसून करता येण्यासारख्या भांडवली बाजारात समभाग खरेदी – विक्रीचे सौदे करून चार पैसे मिळवण्याकडे अथवा गुंतवणुकीत लक्ष घालून संपत्तीनिर्मितीकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. नवीन डिमॅट वा ट्रेडिंग खाते उघडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीचा फायदा करून घेण्यासारखी कंपनी म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सिस्टीम्स लिमिटेड. (सिडीएसएल). फेब्रुवारीमधील उच्च पातळीच्या तुलनेत कंपनीचे बाजारमूल्य २६  टक्यांनी खाली आले आहे. भारतातील सर्वाधिक भागभांडार खाती (डिमॅट) असलेल्या या कंपनीमधील डिमॅट खात्यांची संख्या २ कोटींवर गेली आहे. प्रत्येक डिमॅट खात्यामधील विक्री व्यवहारासाठी कंपनीला शुल्क मिळते तसेच ‘केवायसी’ पडताळणीसाठीदेखील कंपनीला शुल्क मिळत असते. विमा पॉलिसी, कमोडिटी सौद्यांची कागदपत्रे, शैक्षणिक कागदपत्रे यासाठी ई-लॉकर सुविधा, ई-व्होटिंग, कंपन्यांच्या सभांचे डिजिटल मंचावर प्रक्षेपण अशा सेवा कंपनी देत आहे. बाजारातील एकमेव नोंदणीकृत डिपॉझिटरी असलेल्या व कमी जोखमीच्या या कंपनीमध्ये गुंतवणुकीचा जरूर विचार करावा.

आयसीआयसीआय बँकेच्या तिमाही नफ्यात कोविडबाबत तरतुदी करूनही २६ टक्के वाढ झाली आहे वार्षिक तुलनेत नफा दुपटीहून जास्त झाला आहे. बँकेची इतर उप कंपन्यांमधील गुंतवणूक पाहाता सध्याचे बाजारमूल्य आकर्षक आहे.

सरकारचे शेतकऱ्यांसाठी अनुकूल धोरण व हवामान खात्याचा यावर्षी पाऊस समाधानकारक होण्याचा अंदाज यामुळे रॅलिज इंडिया या टाटा समूहातील कंपनीमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. कंपनीच्या नफ्यात शेवटच्या तिमाहीत टाळेबंदीमुळे ५० टक्के घट झाली आहे. परंतु संपूर्ण वर्षांच्या तुलनेत १८ टक्के वाढ झाली आहे. शेतीसाठी लागणारी रासायनिक उत्पादने बनविण्यात कंपनीचा प्रदीर्घ अनुभव आहे. कंपनीचा व्यवसाय अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्यामुळे कंपनीचे कारखाने एप्रिलअखेर सुरूही झाले आहेत.

सरकारने जाहीर केलेल्या अर्थसाहाय्याचा रोख वित्तीय तूट मर्यादित ठेवून मर्यादित अनुदान देण्यावर तसेच कृषी, मत्स्य, दुग्ध उत्पादक, मध्यम व लघू उद्योग आणि श्रमिक जनतेला आत्मनिर्भर बनविण्यावर आहे. मागील अर्थसंकल्पाप्रमाणे बाजाराची त्यावरील प्रतिक्रिया सुरुवातीला नकारात्मक असली तरी काही काळानंतर बाजाराला त्याचे लाभ जाणवतील. अर्थमंत्र्यांच्या शेवटच्या सत्रातील घोषणांवर बाजार पुढील आठवडय़ात प्रतिक्रिया देईल.

sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader