* सुधीर जोशी
आंतरराष्ट्रीय नाणे निधीसह (आयएमएफ) इतर संस्थांनी वर्तविलेल्या जागतिक मंदीच्या भाकीतामुळे या सप्ताहाच्या सुरुवातीला बाजारात मंदीचाच सूर होता. मात्र रिझव्र्ह बँकेने जाहीर केलेल्या उपाययोजनांमुळे भारतीय बाजाराने अखेरच्या दिवसात वरचा सूर पकडला. चारच दिवस व्यवहार झालेल्या या सप्ताहात सेन्सेक्समध्ये ४२९ अंकाची तर निफ्टीत १५५ अंकांची वाढ होऊन मागील सप्ताहातील तेजी कायम राहिली.
रिझव्र्ह बँकेने रिव्हर्स रेपो दर कमी करून बँकांची अतिरिक्त रोकड सुलभतता आपल्याकडे न ठेवता त्याचा वापर वित्तीय व गृहकर्ज देणाऱ्या कंपन्यांना तसेच ग्रामीण सहकारी बँकांना पतपुरवठा करण्यासाठी बँकांना प्रोत्साहित केले. बँकांच्या थकित कर्जाबाबतच्या धोरणातही बदल केले. बाजारात त्याचे अपेक्षित परिणाम दिसून सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी बँकांचा क्षेत्रीय निर्देशांक ६ टक्क्य़ांनी वाढला.
करोनामुळे झालेल्या टाळेबंदीने घरबसल्या कामाचे एक नवे आव्हान समाजापुढे ठेवले. आता बँका, विमा, सरकारी कार्यालये अशा अनेक ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ते अंगवळणी पडू लागले आहे, असे वाटते. तसेच दैनंदिन पैशांचे व्यवहारदेखील तंत्रस्नेही माध्यमाद्वारे करण्याची किंवा ते शिकून घेण्याची लोकांची प्रवृत्ती दिसू लागली आहे.
या नव्याने आकार घेऊ पाहाणाऱ्या समाजव्यवस्थेचा दुहेरी फायदा माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला होईल. या व्यवस्थेसाठी लागणारी उपकरणे, जाळे सेवा यांची मागणी वाढेल तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जवळपास २० टक्के कर्मचाऱ्यांनी घरामधून काम केल्यामुळे खर्चातही बचत होणार आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र गुंतवणुकीसाठी सदाबहारच मानावे लागेल. याची दुसरी बाजू अशी की, वाणिज्यिक जागांची मागणी मात्र कमी होईल.
या आठवडय़ात जाहीर झालेल्या दोन मोठय़ा तिमाही निकालांपैकी विप्रोच्या शेवटच्या तिमाहीत नफ्यामध्ये घट झाली असली तरी संपूर्ण वर्षांचा विचार करता उत्पन्नात चार टक्के तर नफ्यात आठ टक्के वाढ झाली आहे.कंपनीने पुढील वर्षांसाठीचे अंदाज दिले नाहीत. कारण सध्या सारे चित्रच धूसर आहे. टीसीएसच्याही शेवटच्या तिमाहीच्या नफ्यात किंचित घट झाली. कंपनीने पुढील वर्षांसाठी सावध पवित्रा घेतला असला तरी बाजाराने कंपनी बाबतचा आशावाद कायम आहे.
उद्योग क्षेत्र सध्या दोन संकटांचा सामना करीत आहे. काही उद्योग कच्या मालाचा पुरवठा वा कामगारांअभावी बंद आहेत तर काहींच्या उत्पादनांना मागणीचा अभाव किंवा तयार मालाचे वितरण करण्यात अडचणी आहेत. टाळेबंदीमध्ये मिळणाऱ्या सवलतीमुळे कोणत्या क्षेत्राला ठोस फायदा होईल हे पाहावे लागेल.
गेल्या महिन्यात गरीब जनतेसाठी आर्थिक मदतीची घोषणा करणाऱ्या सरकारकडून आता उद्योग क्षेत्राला अर्थप्रोत्साहक सवलती मिळण्याच्या आशेवर भांडवली बाजार आहे. सध्या बाजारात असलेली भीती सार्वजनिक आरोग्याशी निगडित आहे. त्यामुळे त्याच्यावरचा ठोस उपाय सापडे पर्यंत बाजार आशा व निराशेची आंदोलने घेतच राहील. पुढील आठवडय़ात बाजाराची वाटचाल सरकार कडून होणारम्य़ा प्रोत्साहनपर घोषणा आणि कंपन्यांचे निकाल यावर अवलंबून असेल.
sudhirjoshi23@gmail.com