* सुधीर जोशी

या महिन्याच्या एक तारखेपासून सुरू झालेला बाजाराचा उत्साह या सप्ताहातही कायम राहिला. धातूंच्या जागतिक मागणीतील वाढ व आयातीवरील करात वाढ होण्याची शक्यता यामुळे धातू क्षेत्राचा बाजाराच्या वाढीमध्ये प्रामुख्याने सहभाग होता.

कर्जफेडीच्या अधिस्थगनाचा फारसा प्रतिकूल परिणाम न होण्याच्या अंदाजामुळे आतापर्यंत मागे राहिलेल्या बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रामधेही तेजीचे वातावरण होते. शेतीशी निगडित व्यवसायातील कंपन्यांच्या समभागांनाही या सप्ताहात मागणी होती.

सेन्सेक्स व निफ्टी या बाजारातील प्रमुख निर्देशांकात अनुक्रमे ५७३ व १६१ अंकांची वाढ झाली.

येस बँकेच्या संचालकांनी १५ हजार कोटींच्या नवीन भांडवल उभारणीस मान्यता दिली आहे. त्यामध्ये स्टेट बँकेने १,७६० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

एलआयसीदेखील यामध्ये गुंतवणूक करणार आहे. यामुळे आकर्षक किमतीत होणाऱ्या भांडवल उभारणीस चांगला प्रतिसाद मिळेल. स्टेट बँकेच्या आशीर्वादाने वाल्याचा वाल्मिकी होणार हे नक्की.

टीसीएसच्या पहिल्या तिमाहीतील नफ्यात १३.८ टक्यांची घट झाली जी अपेक्षेपेक्षा जास्त होती. तरी बाजारात त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया उमटली नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये पाय रोवलेल्या कंपनीला सद्यपरिस्थितीला सामोरे जाणे फारसे अवघड नाही.

सायबर सुरक्षा, डिजिटल व्यवहार, क्लाउड आधारित सेवांच्या नव्या क्षेत्रात कंपनीला अधिक व्यवसाय मिळेल.

टाळेबंदीमध्ये सवलत मिळाल्यावर टायटन कंपनीने बहुतांशी दालने पुन्हा उघडली आहेत.

परंतु एप्रिल व मे महिन्यात विक्रीवर झालेला परिणाम, सोन्याचे वाढणारे भाव व लोकांच्या उत्पन्नामध्ये घट होण्याच्या भीतीमुळे दागिन्यांवरील खर्च कमी होण्याची शक्यता यामुळे कंपनीच्या समभागांवर विक्रीचे दडपण आहे. अजून काही काळ वाट पाहिली तर या कंपनीमध्ये गुंतवणुकीची चांगली संधी मिळेल.

भारतात व बाहेरच्या देशांतील रेल्वे उद्योगसंबंधित सर्व तांत्रिक सेवा देणारी राइट्स लिमिटेड ही कंपनीदेखील आपल्या नजरेखाली असायला हवी.

सरकारी मालकीची ‘मिनीरत्न’ प्रकारातील या कंपनीने गेल्या संपूर्ण वर्षांसाठी उत्पन्नात व नफ्यात वाढ केली आहे.

करोना संकटाचा प्रकल्प उभारणी व निर्यातीवर परिणाम झाला असला तरी तांत्रिक सल्लामसलत व्यवसायातून कंपनीला ५० टक्यांहून जास्त उत्पन्न मिळते जे अबाधित राहिले.

मार्चअखेर कंपनीकडे ६ हजार कोटींच्या मागण्या शिल्लक होत्या. कर्जाचे नगण्य प्रमाण, सरकारी मागण्यांची हमी व सध्या ११च्या पीई रेशोवरील भाव खरेदीसाठी रास्त वाटतो.

नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांची खऱ्या अर्थाने सुरुवात या सप्ताहात टीसीएसच्या निकालाने झाली. पुढील सप्ताहात आणखी काही निकाल येतील.

टाळेबंदीमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे पहिल्या तिमाहीतील कंपन्यांचे निकाल सुमार आले तरी ते अनपेक्षित नाहीत.

बाजाराचे लक्ष आता पुढील वर्षांतील कारभाराच्या समालोचनावर, जागतिक बाजारांच्या संकेतांवर, करोनाचा फैलाव व त्यावरील औषधाच्या बातम्यांवर राहील.

sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader