* सुधीर जोशी

मागील आठवडय़ात करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाने दर दिवशी घसरणारा बाजार शनिवारच्या विशेष सत्रात अर्थसंकल्पातून अपेक्षाभंगामुळे जोरदार खाली आला. एका दिवसात प्रमुख निर्देशांक दीड टक्क्यांहून अधिक घसरले. ज्यात बँका व धातू उद्योगाचा मोठा वाटा होता. या आठवडय़ात उत्पादन व सेवा क्षेत्रातील आíथक आकडेवारीने मंदीचे ढग नाहीसे होऊन अर्थव्यवस्था पुन्हा मार्गी लागण्याच्या आशा बळावल्या. रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो रेट कायम राखत भविष्यात योग्य वेळी दर कमी होण्याचे संकेत दिले. गुंतवणूकदारांनीदेखील अर्थसंकल्पाच्या सकारात्मक बाबी विचारात घेऊन खरेदीचा सपाटा लावला आणि बाजाराने यू-टर्न घेतला. गेल्या शनिवारच्या तुलनेत या सप्ताहात सेन्सेक्सने तब्बल १,४०६ अंशाची तर निफ्टी निर्देशांकाने ४३७ अंशांची वाढ नोंदविली.

अर्थसंकल्पामधील काही तरतुदींचा आढावा शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या पुढील दिशेसाठी उपयुक्त ठरेल. बँकांमधील ठेवींवरील विमा संरक्षण पाच लाखांपर्यंत वाढविल्यामुळे बँकांमधील मुदत ठेवींचे प्रमाण वाढू शकेल. आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस आणि कोटक या सारख्या खासगी बँकांना म्हणूनच गुंतवणुकीसाठी विचारात घेता येईल. तसेच पायाभूत सुविधांवरील भर, शंभर नव्या विमानतळांची घोषणा, संरक्षण खर्चातील वाढीव तरतुदीचा लाभ लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, जीव्हीके, अल्ट्राटेक सिमेंटसारख्या उद्योगांना होईल. व्यक्तिगत करांमधील कपात आणि ग्रामीण विकासावरील भर याचा फायदा ग्राहकोपयोगी वस्तूंच्या मागणीवर होऊन िहदुस्तान युनिलिव्हर, डाबर, गोदरेज कंझ्युमर, बजाज ऑटोसारख्या कंपन्यांच्या विक्रीमध्ये वाढ होईल. जल जीवन प्राधिकरणाच्या स्थापनेमुळे फिनोलेक्स पाइप्स, अ‍ॅस्ट्रल पॉलीसारख्या कंपन्यांना व पंख्यांवरील आयात शुल्कातील वाढीमुळे अंबर एंटरप्राइझ, ओरिएंट, क्रॉम्प्टनसारख्या कंपन्यांना चांगले दिवस येतील.

करोना विषाणूचे उगम स्थान असणाऱ्या चीनचा जागतिक धातू उद्योगावर मोठा प्रभाव आहे. याला कारण म्हणजे चीनचा धातूंच्या उत्पादनातील व उपभोगातील वाटा ५० टक्क्यांहून जास्त आहे. त्यामुळे चीनमधील कुठल्याही घडामोडींचे, (उदाहरणार्थ चीनचे अमेरिकेसोबतचे व्यापार युद्ध) धातू कंपन्यांवर लगेच परिणाम दिसून येतात. आता हे संकट तात्कालिक ठरले तर या आधीच्या लेखात लिहिल्याप्रमाणे धातू कंपन्यांतील गुंतवणुकीची ही संधीच म्हणावी लागेल. चीनमधील संकटामुळे उत्पादनात घट झाली आणि ही परिस्थिती दीर्घकाळ राहिली तर त्याचा फायदा आरती इंडस्ट्रीज, एसआरएफ, नवीन फ्ल्युरोकेमिकल्स, गॅलॅक्सी सरफॅक्टंट्ससारख्या रासायनिक कंपन्यांना मिळू शकतो.

अर्थसंकल्प आणि त्यापायी बाजारातील अनिश्चितता आता संपुष्टात आली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या द्विमासिक आढाव्यातून पतधोरणही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बाजाराचे लक्ष आता पुन्हा एकदा जागतिक घडामोडींकडे आणि कंपन्यांच्या कामगिरीकडे वळेल. गेल्या दोन आठवडय़ांतील चढ-उतारांकडे दुर्लक्ष केलेल्या गुंतवणूकदारांचा अखेर फायदाच झालेला असेल. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता बाजाराला नजीकच्या काळात अस्थिर ठेवेल, पण अर्थसंकल्पाने ठरविलेले सहा टक्के विकासदर वाढीचे उद्दिष्ट बाजाराला दीर्घकाळात पोषकच ठरेल.

sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader