कोणतीही कर्जबुडवी व्यक्ती ही सुटणार नाही याची जबाबदारी बँकांची असून याबाबत तपास यंत्रणांनीही सजग राहण्याची आवश्यकता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.
अमेरिका दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यामागे बँकांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेले उद्योगपती विजय मल्या प्रकरणाचा पाठलाग सुटला नाही. जेटली यांनी स्पष्ट केले की, आर्थिक गुन्ह्य़ांच्या प्रकरणात तपास करणाऱ्या देशातील संस्था या पुरत्या सक्षम आहेत. त्याचबरोबर कर्जविषयक समेट, तडजोडीची बाब ही ते देणाऱ्या बँकांच्या अखत्यारित येते. देशातील या दोन्ही यंत्रणा भक्कम असून कायद्याचे पालन होत आहे की नाही त्यावर त्यांची नजर असते.
थकीत असलेले कर्ज वसूल करणे आणि ते न करू शकणाऱ्या व्यक्ती, कंपनीची जबाबदारी आपल्यावर घेणे हे बँकांचे कार्य असून कोणतीही कर्जबुडवी व्यक्ती कायद्याच्या कचाटय़ातून सुटता कामा नये, असे मत जेटली यांनी या वेळी व्यक्त केले.
विविध बँकांचे ९,००० कोटींचे कर्ज ्नथकविणारे विजय मल्या हे २ मार्च रोजी भारताबाहेर गेले आहेत. तूर्त ते लंडनमध्ये असल्याचे कळते.
आयडीबीआय बँकेकडून घेतलेले कर्ज अन्यत्र वळविल्याच्या प्रकरणात मल्या यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले आहे. न्यायालयाने मल्या यांना संपत्ती जाहीर करण्यासाठी दिलेली मुदतही गुरुवार, २१ एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा