विदेशात ठेवलेला अवैध पैसा खणून काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असताना, देशातील काळ्या पैशाच्या पिकावरही करडी नजर असू द्या आणि अशा प्रचलित स्थळांचा माग घेणे सुरू ठेवा, असे आवाहन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कर-प्रशासनाला उद्देशून केले.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करताना, कर जाळे विस्तारले जावे यासाठी करदात्यांशी मित्रत्वाचे नाते स्थापले जावे, अशी जेटली यांनी अधिकाऱ्यांकडून अपेक्षा केली. करचुकवेगिरीचे प्रमाण ज्या क्षेत्रात सर्वाधिक आहे, त्यावर करडी नजर ठेवून काळ्या पैशांचा माग घेऊन वसुली झाल्यास कर महसुलाचे लक्ष्यही गाठण्यास मदत होईल, असे जेटली यांनी सांगितले. मुख्य प्रधान आयुक्त, मुख्य महासंचालक आणि प्राप्तिकर विभागाचे प्रधान आयुक्तांच्या विद्यमान २०१४-१५ सालच्या महसुली लक्ष्याचा आढावा घेण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत अर्थमंत्री बोलत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढत असलेले चैतन्य पाहता कर महसूल गोळा होण्याचे प्रमाणही उंचावले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी या निमित्ताने बोलून दाखविली.