अमली पदार्थ तस्करीच्या संघटित टोळ्या व दहशतवाद यांच्या अभद्र युतीला होणारा अर्थपुरवठा थांबवणे गरजेचे आहे, कारण त्यामुळे शांतता, सुरक्षितता व स्थिरता धोक्यात येत आहे, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत अमली पदार्थविषयक परिषदेत जेटली यांचे मंगळवारी भाषण झाले. दहशतवाद व अमली पदार्थाची तस्करी हे फार मोठे धोके आहेत, त्यावर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रितपणे लढा देताना, त्यासाठी होणारा अर्थपुरवठा रोखला पाहिजे असे त्यांनी आवाहन केले. सुसंस्कृत मानवी समुदायाला दहशतवादाचा मोठा धोका आहे. दहशतवादाला सीमा नसतात व कुठलीही शहरे, निरपराध नागरिक त्याला बळी पडू शकतात. अमली पदार्थ तस्करी व दहशतवाद यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे शांतता, स्थिरता व सुरक्षितता धोक्यात येत आहे. त्यामुळे या अभद्र युतीविरोधात सर्व देशांनी एकजुटीने लढले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले.
अमली पदार्थ व संघटित गुन्हेगारीतून निर्माण होणारा काळा पैसा व पैशाचा अवैध प्रवाह हे आजच्या काळातील धोके आहेत. यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी त्यांच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या पाहिजेत. अमली पदार्थाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या तीन जाहीरनाम्यांना भारत बांधील आहे असे सांगून जेटली यांनी या दोन्ही धोक्यांची भारताला जाणीव असून बंदोबस्तासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे सांगितले.