आपण केवळ देशाच्या निर्मिती क्षेत्राच्या क्षमतेत वाढ आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. व्याजदराबाबत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर यांच्या बाबतीत आपला टीकेचा सूर नक्कीच नव्हता, असे सांगत अरुण जेटली यांनी सोमवारच्या आपल्या भाषणाबद्दल नाहक गैरधारणा निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण केले.
येथे सोमवारी झालेल्या ‘मेक इन इंडिया’ कार्यशाळेच्या व्यासपीठावर गव्हर्नर राजन यांच्यावर टीका करणाऱ्या प्रसारमाध्यमांत छापून आलेल्या बातम्यांचा संदर्भ देत, जेटली यांनी मंगळवारी फेसबुकवर खुलासेवार टिप्पणी केली. ‘दूषित कार्यसूचीसह केले जाणारे वार्ताकन’ या शीर्षकासह फेसबुकवर ही टिप्पणी जेटली यांनी टाकली आहे. जेटली यांनी म्हटले आहे की, ‘‘माझ्या संपूर्ण भाषणांत मी रिझव्‍‌र्ह बँक अथवा तिचे गव्हर्नर यांच्याविरोधात एक शब्दही उच्चारलेला नाही. जे काही वृत्त प्रसिद्ध झाले आहे ते न केल्या गेलेल्या भाषणाचे आहे. त्यातून असे दर्शविले गेले आहे की, मी गव्हर्नरांविरुद्ध बोललो आणि आम्हा दोहोंमध्ये मतभेद असल्याचे सूचित केले.’’
व्यासपीठावर गव्हर्नर राजन यांच्या उपस्थितीत सोमवारी जेटली यांनी केलेल्या भाषणात, ‘‘भांडवलाचे उच्च दर हाच देशाच्या निर्मिती उद्योगाला मंदीत लोटणारा सर्वात मोठा घटक ठरला आहे.’’ त्यांचे हे विधान म्हणजे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर व्याजदर कपातीसाठी अप्रत्यक्ष दबावच होता आणि दरकपात करीत नसल्याबद्दल अर्थमंत्र्यांनी त्यांना दिलेले दूषणच होता, असाच माध्यमांनी विश्लेषणाअंती अर्थ ध्वनीत केला होता.
जेटली यांनी स्पष्ट केले आहे की, माझा भाषणाचा रोख हा भांडवलाची खर्चीकता कमी व्हावी असाच होता. जगाचे निर्मिती केंद्र बनण्याची महत्त्वाकांक्षा ठेवून सुरू असलेल्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसारख्या विषयावर बोलताना कोणीही हीच बाब प्रकर्षांने मांडेल.
वार्ताकन पद्धतीचा समाचार घेताना ते म्हणाले, ‘‘माझ्या भाषणाबद्दल माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तातून एक गोष्ट मला पुरती पटली आहे की सध्याच्या पत्रकारितेच्या स्पर्धात्मक युगात, पत्रकार त्यांच्या बातमीत अस्तित्वात नसलेल्या ‘कोना’चा पाठलाग करीत असतात. माझ्या बाबतीत भाषणाचीच उलटफेर करून हा कोन निर्माण केला गेला.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा