राष्ट्रीयकृत बँकेच्या नव्या अध्यक्षाचे नाव जाहीर होईपर्यंत बँकेच्या विद्यमान चार व्यवस्थापकीय संचालकांनाच तूर्त बँक सांभाळण्यास सांगण्यात आले आहे. मात्र पैकी कुणालाही हंगामी अथवा तात्पुरता अध्यक्ष म्हणून बढती देण्यात आलेली नाही. ए. कृष्णकुमार, एच. कॉन्ट्रॅक्टर, एस. विश्वनाथन आणि अरुंधती भट्टाचार्य हे चारही जण नवीन अध्यक्ष येईपर्यंत त्यांच्याकडे असलेल्या सध्याच्या पदाचा कार्यभार पाहणार आहेतच. पैकी दोन व्यवस्थापकीय संचालकांच्या बँकेच्या अध्यक्षपदासाठी मुलाखती झालेल्या आहेत. मात्र त्यातही पात्र एकमेव अरुंधती भट्टाचार्य याच आहेत. कारण बँकेच्या प्रमुखपदी येणारी व्यक्तीचा निवृत्तीचा कालावधी दोन वर्षांचा असावा असा नियमच आहे. आणि एसबीआय कॅपिटलमधून आलेल्या भट्टाचार्य याच सध्या त्यासाठी योग्य आहेत. त्यांच्या निवृत्तीस अडिच वर्षे आहेत.
वेळ यंदाच चुकली नाही..
स्टेट बँकेच्या इतिहासात मावळत्या अध्यक्षाच्या हातून नव्या उमेदवाराने सूत्रे घेण्याची वेळ यंदा पहिल्यांदाच चुकलेली नाही. यापूर्वी दोनवेळा असे घडले आहे. खुद्द ते अध्यक्ष होण्यापूर्वी ओ. पी. भट्ट निवृत्त झाले तेव्हा आर. श्रीधरन हे हंगामी अध्यक्ष राहिले होते. तर भट्ट हेही पूर्णवेळ अध्यक्ष होण्यापूर्वी पूर्वाश्रमीचे ए. के. पुरवार निवृत्त झाल्यानंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून टी. एस. भट्टाचार्य हे काम पाहत होते.
बँक क्षेत्रात नवा पायंडा
शिल्लक रकमेवरील शुल्क नाहीसे करण्याचा खातेदारांच्या हिताचा निर्णय बँकेला मात्र ३०० कोटी रुपयांचे उत्पन्नावर पाणी फिरणारा ठरला. सवलतीच्या दरातील गृह कर्ज भारतीय बँक इतिहासात प्रथमच अंमलात आणून चौधरी यांनी त्याचा पायंडा अन्यना पाडण्यास भाग पाडले. मात्र स्पर्धक आघाडीच्या खासगी बँकांनीही त्याचा कित्ता गिरविल्यानंतर सर्वात कमी व्याजदर याबाबत बँकेबाबतच अविश्वासार्हता निर्माण झाली.
किंगफिशरबाबत मात्र आक्रमक
मुंबई निर्देशांक १०.५ टक्क्य़ाने वधारत असताना २०११-१२ मध्ये स्टेट बँकेने आघाडीच्या कंपन्यांच्या समभागांची विक्री केली. हिंदाल्को, एनपीसीआय, आरआयएनएल, उत्कल अ‍ॅल्युमिनिआ इंटरनॅशनलसारख्या कंपन्यांना पुनर्वित्त करण्याचा निर्णय घेणाऱ्या चौधरी यांच्या कारकिर्दीतच किंगफिशर एअरलाईन्सच्या मात्र मुसक्या आवळल्या गेल्या. केंद्र सरकारचा पाठींबा असूनही मल्ल्या यांच्यामागे लावलेला तगादाही अपयशी ठरताच कंपनीची मालमत्ता, समभाग ते थेट ब्रॅण्डच विकून कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न झाला. किंगफिशरबाबत चांगला निर्णय गळ्यापर्यंत पाणी आल्यावर घेतला गेला, असे चौधरी यांचे निकटवर्तीयही मान्य करतात.
नफा घसरला अन् थकित कर्जेही वाढली
चौधरी यांच्या कारकिर्दीत प्रथमच बँकेला नफ्यातील घसरणीला सामोरे जावे लागले. त्यांच्या कालावधीतील ९ तिमाहीपैकी ६ तिमाहींमध्ये निव्वळ नफ्यात घट नोंदली गेली आहे. तर स्टेट बँकेच्या गेल्या १० पैकी ३ तिमाहींमध्ये चलत नफ्यातही घट राखली गेली आहे. चौधरी यांच्या येण्याआधीच्या एका तिमाहीपासून आतापर्यंत म्हणजेच गेल्या १० पैकी ८ तिमाहींमध्ये ढोबळ अनुत्पादक मालमत्ता व ७ तिमाहींमध्ये निव्वळ अनुत्पादक मालमत्ता वधारली आहे. चौधरी यांच्या कालखंडात बँकेचे हे दोन्ही प्रमुख थकित कर्जाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. मार्च २०११ मधील निव्वळ थकित कर्जाचे १.६३ टक्क्य़ांवरून जून २०१३ मध्ये २.८३ टक्के तर ढोबळ थकित कर्जाचे प्रमाण याच कालावधीत अनुक्रमे ३.२८ वरून ५.५६ टक्के झाले.
बँक समभागाचीही आपटी
चौधरी यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा घेतली तेव्हा कंपनीच्या समभागाचे मूल्य २,९०० रुपये होते. ते ३० सप्टेंबरला चौधरी निवृत्त होईपर्यंत तेही खालावून १,६१५ रुपयांवर आले. चौधरी यांच्या कारकिर्दीत बँक समभाग ४० टक्क्य़ांहून आपटला आहे. याउलट सेन्सेक्स १.५० टक्क्य़ांनी वधारला; तर बँकेक्स हा संबंधित क्षेत्रीय निर्देशांक १५ टक्क्य़ांनी घसरला आहे.

Story img Loader