रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी सायंकाळी जाहीर केलेल्या सोने आयात आणि भांडवल नियंत्रणाच्या र्निबधांबाबत रोष व्यक्त करणारे भयंकर पडसाद शुक्रवारी शेअर बाजारात उमटले. या रोषातून विदेशी वित्तसंस्थांनी समभाग विकून बाजारातून काढून घेतलेल्या डॉलररूपी गुंतवणुकीमुळे चलन बाजारात रुपया प्रति डॉलर ६२ पल्याड गेला आणि परिणामी सेन्सेक्समधील घसरण तब्बल ८०० अंशांपर्यंत रुंदावत गेली. दिवसअखेर चार वर्षांतील सर्वात मोठय़ा ७६९ अंशांच्या घसरणीसह ‘सेन्सेक्स’ १८,५९८ वर स्थिरावला. रिझव्‍‌र्ह बँकेच्या उपायांवरील रोष नव्हे तर अमेरिकेच्या सुधारत असलेल्या अर्थस्थितीबाबत उमटलेले हे पडसाद असल्याचे पालुपद अर्थमंत्रालयाने प्रतिक्रिया व्यक्त करताना कायम ठेवले.

डॉलर
रिझव्‍‌र्ह बँकेच्या विदेशी चलनाचा देशाबाहेर विसर्ग रोखण्यासाठी र्निबधांचे चलन बाजारातही पडसाद उमटले. भारतीय चलनाने बुधवारअखेर ६१.४३ चा स्तर गाठताना ऐतिहासिक नीचांक नोंदविलाच होता. तर स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीनं व्यवहार झालेल्या सलग दुसऱ्या दिवशी त्याने नवीन नीचांक दाखविला. बुधवारच्या तुलनेत आणखी २२ पैशांनी खालावत रुपयाने प्रति डॉलर ६१.६५ अशा विक्रमी नीचांकाला आज गाठले. दिवसाच्या मध्यान्हाला तर त्याने ६२.०३ असा अभूतपूर्व तळ दाखवून शेअर बाजारात भीतीचे तरंग पोहचविले.

निर्देशांक
घसरणीसह खुल्या झालेल्या निर्देशांकांची घसरण वाढतच गेली, दिवसअखेर सेन्सेक्समध्ये ७६९.४१ (३.९७%) अंशांच्या तुटीने तर
निफ्टीत २३४.४५ अंशांच्या हानीसह ती स्थिरावली.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या उपायांनंतरही रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने, पतमानांकन घटविले जाण्याच्या भीतीने बाजारातील थरकाप आणखी वाढविला.
परिणाम : बाजारातील पडझडीने सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक मूल्य मातीमोल झाले. सेन्सेक्समधील ३० पैकी २९ कंपन्यांच्या समभागांमध्ये १० टक्क्यांपर्यंत घसरण दिसली, तर बाजारातील प्रत्येक १० समभागांपैकी सहा समभाग घसरणपंथाला होते.

सोन्याला तोळ्यामागे ३०,६९५ पर्यंत लकाकी!
गडगडलेल्या शेअर बाजाराचा फायदा सराफ बाजारात तेजीच्या रूपाने शुक्रवारी दिसून आला. ईदपासून गेला सलग आठवडाभर सुरू असलेल्या मौल्यवान धातूंच्या तेजीला शुक्रवारी  झळाळी चढली.
मुंबईच्या सराफ बाजारात ९९.५ टक्के शुद्धतेचे स्टँडर्ड सोने तोळ्यामागे शुक्रवारी एकदम १,१७५ रुपयांनी वाढून ३०,६९७ रुपयांवर गेले.  चांदीच्या दरातही एकाच दिवसातील व्यवहारात जवळपास ३ हजार रुपयांची वाढ नोंदली गेली आणि किलोमागे रु.४९,९८० पर्यंत तिचा भाव जाऊन धडकला.
सोने हव्यासावर र्निबध म्हणून १० टक्क्यांपर्यंत आयात शुल्कवाढीचे सरकारचा निर्णय आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या आयातीला बांध घालणाऱ्या उपायानंतरही, सोन्याच्या मागणीने सरलेल्या तिमाहीत दशकातील उच्चांक गाठल्याचा ‘जागतिक सुवर्ण परिषदे’ने काल जाहीर केलेल्या अहवालात स्पष्ट झाले.

Story img Loader