पुण्या – मुंबईत टाळेबंदीत वाढ अपरिहार्य दिसत असून, उत्तरोत्तर कठोर होत असलेल्या साथ प्रतिबंधक उपायांनी दैनंदिन गरजेचे वाण – सामानही मिळविणे सर्वसामान्यांना दुरापास्त बनले आहे. टाळेबंदीत अनेक वस्तू निर्मात्यांचे उत्पादन ठप्प अथवा अत्यल्प क्षमतेने सुरू असल्याने, छोटय़ा किराणा विक्रेत्यांना वस्तू – पुरवठाही घटला आहे. अशावेळी  विक्रेत्यांना घाऊक किमतीत थेट व खात्रीशीर पुरवठय़ाचा उपाय मेट्रो कॅश अँड कॅरी इंडियाने राबविला असून, त्याचा जनसामान्यांना फायदा होत आहे.

बहुराष्ट्रीय आधुनिक घाऊक विक्रेता असलेल्या मेट्रोची देशातील १७ राज्यात दालने आणि ४.५० लाखांहून अधिक किरकोळ विक्रेते, उपाहारगृह व हॉटेल व्यावसायिक असा ग्राहक पाया आहे. महाराष्ट्रात मुंबईत (बोरिवली व भांडूप) दोन आणि नाशिक अशी त्याची तीन दालने आहेत. मुंबई महानगर परिसरात ३०,००० छोटे दुकानदार मेट्रोकडून ग्राहकांच्या दैनंदिन गरजेच्या वाण – सामाना व्यतिरिक्त, सध्याच्या स्थितीत गरजेचे ठरलेल्या मास्क, हँड सॅनिटायजर आणि जंतुनाशक द्रव्यांचा पुरवठा मिळवत आहेत, असे मेट्रो कॅश अँड कॅरी इंडियाचे संचालक (पुरवठा शृंखला) मनीष सबनीस यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

आपल्या नोंदणीकृत व्यावसायिक ग्राहकांव्यतिरिक्त, ज्या कुणाला शहराच्या विशिष्ट भागात किराणा वस्तूंचा पुरवठा हवा असेल, अशा व्यावसायिकांची त्वरित नोंदणी करून घेऊन त्यांना इच्छित ठिकाणी माल लवकरात लवकर पोहचता केला जाईल, अशी सोयही करण्यात आल्याचे सबनीस यांनी सांगितले. मेट्रोचे संकेतस्थळ (https://www.metro.co.in) आणि मोबाईल अ‍ॅपवर जाऊन, गुमास्ता परवाना, जीएसटी नोंदणी क्रमांक असणारा कुणीही व्यावसायिक काही मिनिटांत सदस्य म्हणून नोंदणी करून सध्याच्या कठीण काळात हा व्यवसाय सुरू करू शकतो, असे ते म्हणाले.

मेट्रोने अनेक शेतकऱ्यांशी थेट संधान जोडले असून, धान्य, भाज्या, फळ-फळावळीची उपलब्धता तसेच काही स्व-निर्मित उत्पादनांमुळे ग्राहकांची कशाही तऱ्हेने गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.डिजिटल उपायांसह, स्व-खर्चाने मालाच्या पुरवठय़ाची व्यवस्थाही केली गेली असल्याचे सबनीस यांनी स्पष्ट केले. शिवाय, भांडूप, बोरिवली येथील दालनेही पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, तेथूनही अपेक्षित वस्तूंचा पुरवठा विक्रेत्यांना मिळविता येईल.