चौथ्या तिमाहीत ७.९ टक्के विकासदर; भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत ७.९ टक्के, तर संपूर्ण २०१५-१६ वर्षांसाठी तो ७.६ टक्के राहिला आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातील (जीडीपी) वाढीचा हा दर गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम राहिला आहे. तर जागतिक स्तरावरही सर्वात वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान यातून भक्कम बनले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मरगळ असलेल्या निर्मिती क्षेत्राने झेप घेतली असून त्याला कृषी क्षेत्रानेही साथ दिली आहे. परिणामी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने मंगळवारी जाहीर केलल्या आकडेवारीतून, संपूर्ण २०१५-१६ आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्था ७.६ टक्के दराने वाढल्याचे स्पष्ट झाले. फेब्रुवारीत अंदाजलेल्या दराइतकाच प्रत्यक्ष वृद्धीदर नोंदला गेला आहे.
२०१५-१६ मधील पहिल्या तीन तिमाहीत विकास दर अनुक्रमे ७.५ टक्के (एप्रिल ते जून), ७.६ टक्के (जुलै ते सप्टेंबर) व ७.२ टक्के (ऑक्टोबर ते डिसेंबर) राहिला आहे. तर जानेवारी ते मार्च २०१६ दरम्यान तो थेट ७.९ टक्के नोंदला गेला आहे. चौथ्या तिमाहीच्या रूपात भारताने गेल्या सात वर्षांच्या तळात विकास प्रवास राखणाऱ्या चीनलाही मागे टाकले आहे.
जानेवारी ते मार्च २०१६ या आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीत निर्मिती क्षेत्राची वाढ ९.३ टक्के तर सलग दुसरे अवर्षणाचे वर्ष झेलणाऱ्या कृषी क्षेत्राच्या वाढीचा दर २.३ टक्के राहिला आहे. या दरम्यान खनिकर्माची वाढ ८.६ टक्के दराने झाली आहे. त्याचबरोबर ऊर्जा, वायू तसेच इतर सेवा क्षेत्राची वाढ ९.३ टक्केदराने झाली आहे.
चौथ्या तिमाहीत बांधकाम क्षेत्र ४.५ टक्क्याने तर व्यापार, आदरातिथ्य, वाहतूक, दळणवळण आदी सेवा ९.९ टक्क्यांनी विकसित झाल्या आहेत. वित्तीय तसेच स्थावर मालमत्ता क्षेत्राची वाढ ९.१ टक्के राहिली आहे, तर सार्वजनिक व्यवस्थापन, संरक्षण क्षेत्र ६.४ टक्क्यांनी वाढले आहेत.
संपूर्ण २०१५-१६ मध्ये कृषी क्षेत्र आधीच्या वर्षांतील ०.२ टक्के घसरणीतून यंदा १.२ टक्क्यांनी वाढण्या इतपत सावरले आहे. याच दरम्यान निर्मिती क्षेत्र ५.५ टक्क्यांवरून ९.३ टक्क्यांवर झेपावले आहे.
प्रमुख क्षेत्राची वाढ चार वर्षांच्या उच्चांकावर
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच महिन्यात देशाच्या पायाभूत सेवा क्षेत्राची वाढ ही गेल्या चार वर्षांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. विद्युतनिर्मिती तसेच तेल व वायू क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर एप्रिलमधील प्रमुख क्षेत्र ८.५ टक्क्याने वाढले आहे.
औद्योगिक उत्पादनात कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, खते, तेल व वायू उत्पादने, स्टील, सिमेंट व विद्युतनिर्मिती अशा आठ क्षेत्रांचा समावेश असलेल्या निर्देशांकाने फेब्रुवारी २०१२ नंतरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.

विकास दर..
वर्ष २०१५-१६ : ७.६ टक्के
जाने-मार्च तिमाही: ७.९ टक्के
ऑक्टो-डिसें. तिमाही: ७.२ टक्के
जुलै-सप्टें. तिमाही: ७.६ टक्के
एप्रिल-जून तिमाही: ७.५ टक्के

यंदा अपेक्षित असलेल्या दमदार पावसाच्या जोरावर आगामी २०१६-१७ मध्ये देशाचा विकास दर ८ टक्के असेल. पायाभूत तसेच सामाजिक घटकांवरील भांडवली खर्चावर सरकारचा यंदाही भर राहणार आहे. चांगल्या मान्सूनमुळे कृषी क्षेत्रातील उत्पन्न वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला निश्चितच चालना मिळेल.
’ शक्तिकांता दास, आर्थिक व्यवहार सचिव

Story img Loader