बीएमडब्ल्यूपाठोपाठ ऑडी या जर्मन बनावटीच्या कंपनीनेही जानेवारी २०१४ पासून वाहनांच्या किमती वाढविण्याची घोषणा केली आहे. आलिशान प्रवासी वाहननिर्मिती क्षेत्रातील या कंपनीने ५ टक्क्यांपर्यंत किमती वाढविण्याचे ठरविले आहे. विद्यमान परिस्थितीत व्यवसाय टिकविण्यासाठी किमतवाढीवाचून पर्यायच नसल्याचे कंपनीच्या भारतातील व्यवसायाचे प्रमुख जो किंग यांनी म्हटले आहे. कंपनी ए४, ए६, ए८, एस४, एस६ या सेदान; तर क्यू३, क्यू५ आणि क्यू७ ही स्पोर्ट युटिलिटी वाहने तयार करते. त्यांची किंमत २७.९३ लाख ते २.१४ कोटी रुपये आहे. जर्मनीच्याच बीएमडब्ल्यूनेही याच आठवडय़ात किंमतवाढीची घोषणा केली. यानुसार कंपनीच्या कार नव्या वर्षांत १० टक्क्यांपर्यंत महाग होणार आहेत. कंपनीने ऑगस्टमध्येही ५ टक्क्यांनी किमती वाढविल्या होत्या.