कृष्णा गोदावरी खोऱ्यातील डी६ विहिरींमधून रिलायन्समार्फत होणाऱ्या तेल व वायू उत्पादनाचे नियंत्रक व महालेखापालामार्फत (कॅग) लेखापरिक्षण करण्यात येणार आहे. केंद्रीय तेल खात्याचे सचिव विवेक रे यांनी याबाबत येत्या दोन आठवडय़ात रिलायन्सचे लेखापरीक्षण नव्याने करण्यात येणार आहे.  रे यांनी याबाबत भारताचे नियंत्रक व महालेखापाल विनोद राय यांच्याबरोबर दोनवेळा भेटून चर्चा केली आहे. ‘याबाबतचे सर्व वादग्रस्त मुद्दे निकालात निघाले असून लेखापरीक्षण होणारच याबाबत आम्ही ठाम असून कॅग त्याबाबतचे कर्तव्य पार पाडेल’ असे रे यांनी म्हटले आहे. रिलायन्सच्या अंतर्गत व्यवहारांचे लेखापरिक्षण करण्याचा सरकारला अधिकार नसल्याचा दावा करण्यात आल्यानंतर जानेवारीत ते थांबविण्यात आले होते.
 रिलायन्स इंडस्ट्रिजच्या कृष्णा गोदावरी खोऱ्यातील डी६ मधील विविध विहिरींमधून होणारे इंधन उत्पादन व त्याची विक्री याबाबतचे आर्थिक व्यवहार ‘कॅग’मार्फत तपासण्यात येणार होते. मात्र त्याला रिलायन्सने ही कंपनी आणि तिचे ग्राहक यांच्यातील अंतर्गत बाब असल्याचे नमूद करून विरोध दर्शविला होता. याबाबत कंपनीचे मुख्य प्रवर्तक मुकेश अंबानी यांनी खुद्द केंद्रीय तेल व वायू खात्याचे मंत्री, सचिव यांची भेट घेतली होती. तर ‘कॅग’मार्फत लेखापरीक्षण करणारा चमू रिलायन्सच्या नवी मुंबईतील मुख्यालयातही वेळोवेळी धडकला होता. केंद्रीय पेट्रोलियम खात्याला वेळोवेळी ‘कॅग’ने पत्रव्यवहार करून लेखापरीक्षण कसे आवश्यक आहे, हे पटवून दिले होते. आता अखेर त्यांचाच यामध्ये विजय झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा