वाणिज्य बँका ‘तुमचे ग्राहक जाणून घ्या अर्थात केवायसी’अंतर्गत अनावश्यक माहिती विचारीत असून त्यामुळे खातेदारांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला घातला जातो, अशा तक्रारी दाखल झाल्यामुळे रिझव्र्ह बँकेने अनावश्यक माहिती घेणे टाळण्याची सूचना केली आहे.
याबाबत गेल्या सप्ताहात जारी केलेल्या परिपत्रकात, बँकेत खाते उघडते वेळी २००२ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केलेलीच आवश्यक तेवढीच माहिती वाणिज्य बँकांकडून घेतली जावी, असे या संदर्भात रिझव्र्ह बँकेने सूचित केले आहे. अनेक बँकांच्या ‘केवायसी’ प्रश्नावलीत परदेशातील नातेवाईकांची माहिती, मुलांची संख्या, पती/पत्नीची जन्मतारीख, विवाहाची तारीख, मागील तीन वर्षांत केलेल्या प्रदेश प्रवासाचे तपशील, दागिन्यांतील गुंतवणूक, जीवनशैलीविषयक अनेक अनावश्यक प्रश्न असल्याचे आढळून आले आहे. बँकांना केवायसीच्या प्रश्नावलीचे दोन भाग करून आवश्यक व वैकल्पिक अशा दोन भागांत हे प्रश्न विचारावेत, अशी सूचना करतानाच वैकल्पिक प्रश्नांची उत्तरे देणे खातेदारांना बंधनकारक करू नये, अशी सूचनाही रिझव्र्ह बँकेने केली आहे.
आर्थिक विकासदराची ४.८ टक्क्यांवर घसरण
‘क्रिसिल’चा कयास
मुंबई : नामांकित पतमानांकन संस्था ‘क्रिसिल’ने भारताच्या आर्थिक विकासदर (जीडीपी) संबंधी आपल्या अंदाजात कपात करून तो चालू आर्थिक वर्षांअखेर ४.८ टक्के राहण्याचे भाकीत वर्तविले आहे. चांगल्या मान्सूनच्या परिणामी कृषीक्षेत्रात अर्थव्यवस्थेतील योगदान वाढावे हाच एकमेव आशेचा किरण या अंदाजात सुधारणेच्या दिशेने दिसतो, असेही तिने म्हटले आहे.
‘क्रिसिल’ने २०१३-१४ साठी या आधी अर्थव्यवस्था ५.५ टक्के दराने वाढेल, असे म्हटले होते. शिवाय विद्यमान सरकारने वित्तीय तुटीबाबत निश्चित केलेली ४.८ टक्क्यांची लक्ष्मणरेषा पाळता येणेही कठीण असून, ही तूट प्रत्यक्षात ५.२ टक्क्यांवर जाईल, असा क्रिसिलचा कयास आहे. क्रिसिलच्या व्यवस्थापकीय संचालिका रुपा कुडवा यांच्या मते आता आपल्या अर्थव्यवस्थेने तळ गाठला असून, यापुढे घसरण दिसत नाही. परंतु या स्थितीतून जलद उभारीही संभवत नाही, असा त्यांचा इशाराही आहे.