खासगी क्षेत्रातील तिसरी मोठी बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला अनुलक्षून पाऊल टाकताना, आपल्या ग्राहकांना बँकेच्या शाखेत न येता, गरज पडेल तेव्हा आवश्यक त्या कागदपत्रांवरील स्वाक्षरीही ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केव्हाही, कुठूनही पाठविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ही ई-स्वाक्षरीची सुविधा ग्राहकांना प्रदान करण्यासाठी बँकेने डिजिटल सुरक्षा क्षेत्रातील कंपनी ई-मुद्रा लिमिटेडबरोबर सामंजस्य केले आहे. त्यामुळे बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न केलेल्या खातेधारकांना गरज पडेल तेव्हा स्वाक्षरी केलेले दस्तऐवज सेकंदाचा विलंब न लावता बँकेला पोहोचते करता येतील. किंबहुना, ग्राहकांना केवळ स्वाक्षरीसाठी संमती कळविल्यावर, आधार प्रमाणीकरणावर आधारित त्यांची डिजिटल स्वाक्षरी बँकेकडून स्वयंचलितरीत्या मिळविली जाईल. अशी स्वाक्षरी कायदेशीररीत्या वैध आणि सुरक्षितही आहे, असा बँकेचा दावा आहे.

Story img Loader