खासगी क्षेत्रातील तिसरी मोठी बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने आपल्या २०व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्वमालकीचे घर किफायती हप्त्यांद्वारे घेऊ इच्छिणाऱ्या अत्यल्प उत्पन्न गटातील जनसमूहासाठी ३० वष्रे मुदतीची ‘आशा होम लोन्स’ नावाची गृहकर्ज योजना प्रस्तुत केली आहे.
ग्राहकांना त्यांचे व्यक्तिगतच नव्हे तर कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न जमेस धरून या योजनेसाठी पात्रता मिळविता येईल. त्यामुळे कौटुंबिक उत्पन्न मासिक आठ ते १० हजारांदरम्यान असणाऱ्यांनाही या योजनेत छोटय़ा नगरांमध्ये (१० लाखांहून कमी लोकसंख्येच्या) अगदी किमान एक लाख रुपयांपासून कमाल १५ लाखांपर्यंत तर बडय़ा नगरांमध्ये (१० लाखांहून अधिक लोकसंख्येच्या) कमाल २५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळविता येईल. हे कर्ज बदलत्या (फ्लोटिंग) अथवा स्थिर (फिक्स्ड) अशा दोन्ही प्रकारांत आकर्षक व्याज दरात आणि अत्यंत सोप्या दस्तावेजांसह उपलब्ध करण्यात आले आहे. या स्तरातील ग्राहकांची स्थिती लक्षात घेऊन या योजनेची कर्जमंजुरीची प्रक्रिया सुलभ बनविली गेली आहे. उल्लेखनीय म्हणजे आशा होम लोन्स योजनेत घराच्या बाजारमूल्याच्या ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळविता येईल.
बँकेचे कन्झ्युमर लेंिडग व पेमेंट विभागाचे प्रमुख जयराम श्रीधरन यांनी सांगितल्याप्रमाणे, बडय़ा शहरांच्या परिघावरील आणि दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहरात सुरू असलेल्या परवडणाऱ्या दरातील गृहनिर्माणाला मोठी मागणी असून, या प्रचंड मोठय़ा शक्यता असलेल्या तरीही दुर्लक्षित बाजारपेठेकडे प्रथमच कुणा वाणिज्य बँकेचे लक्ष गेले आहे. आशा होम लोन्सद्वारे ही उणीव अ‍ॅक्सिस बँकेकडून भरून काढली जाईल. शिवाय चार भिंतींचे पक्के घर मिळविण्याचे छोटे पगारदार अथवा छोटा-मोठा रोजगार, स्वयंरोजगार करणाऱ्यांच्या स्वप्नपूर्तीतही भागीदार होण्याची बँकेला संधी मिळेल. या योजनेतून उपलब्ध गृहकर्ज हे ३२५ चौरस फूट व अधिक क्षेत्रफळाच्या घरांसाठी असेल. शिवाय हे कर्ज नवीन बांधकाम सुरू असलेल्या, पुनर्वक्रिी होत असलेल्या, तात्काळ ताबा देणारी तयार घरे तसेच भूखंडाची खरेदी व त्यावर घराचे बांधकाम यासाठी दिले जाईल, असे श्रीधरन यांनी स्पष्ट केले.