अॅक्सिस म्युचुअल फंडाने आज आपल्या समभाग तसेच ऋण आणि मुद्रा बाजारातील गुंतवणुकीतून उत्पन्नाच्या निर्मितीचा प्रयत्न करणारी मुदत मुक्त (ओपन एंडेड) बॅलन्स्ड योजना ‘अॅक्सिस चिल्ड्रन्स गिफ्ट फंडा’च्या शुभारंभाची घोषणा केली. समभाग संलग्न साधनांमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून दीर्घावधीत भांडवलवृद्धीचे उद्दिष्ट या योजनेने राखले आहे. १८ नोव्हेंबरपासून २ डिसेंबपर्यंत हा फंड प्रारंभिक गुंतवणुकीसाठी खुला राहील.
वाढत्या मुलांच्या वाढत जाणाऱ्या गरजांनुरूप बचत आणि दीघरेद्देशी गुंतवणुकीच्या पर्यायाच्या रूपात अॅक्सिस चिल्ड्रन्स गिफ्ट फंड आदर्श मानता येईल. फंडातील गुंतवणुकीकडे मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षण आणि विवाहाला ध्यानात घेऊन किंवा आपत्कालीन स्थितीसाठी उपयुक्त एक गुंतवणूक या रूपातही पाहिले जाऊ शकेल. मात्र गुंतवणूक ही केवळ अल्पवयीन बालकांच्या नावेच (गुंतवणूकसमयी वय १८ वर्षांपेक्षा कमी) केली जाऊ शकेल, जोवर गुंतवणूकदार सजाण होत नाही तोवर त्याचे माता-पिता अथवा कायदेशीर पालकांद्वारे तिचे प्रतिनिधित्व केले जाईल. याव्यतिरिक्त, योजनेत ‘दाता’ नामक गुंतवणुकीची एक अनोखी तरतूदही केली गेली आहे, ज्यायोगे गुंतवणुकीची कोणतीही किमान मर्यादा न ठेवता, अल्पवयीन गुंतवणूकदाराला त्याचे आजी-आजोबा अथवा अन्य जवळच्या नातेवाईकांकडून भेट स्वरूपात योजनेत गुंतवणूक करण्याची मुभा प्रदान करण्यात आली आहे.
अॅक्सिस चिल्ड्रन्स गिफ्ट फंडाद्वारे, समभाग (४० टक्के ते ५५ टक्के) आणि स्थिर उत्पन्न साधनांमध्ये (किमान २५ टक्के ते कमाल ५५ टक्के) जवळपास सारखीच गुंतवणूक केली जाणार असल्याने, फंडाच्या कामगिरीच्या तुलनेसाठी ५० टक्के निफ्टी ५० निर्देशांक अधिक ५० टक्के क्रिसिल कम्पोजिट बाँड फंड इंडेक्स, असा एक स्वनिर्धारित मानदंड बनविला गेला आहे.
हा फंड डायरेक्ट तसेच रेग्युलर अशा दोन प्रकारांमध्ये आणि त्या प्रत्येकात सक्तीचे लॉक-इन आणि लॉक-इन विना अशा दोन उपप्रकारात प्रस्तुत झाला आहे. प्रत्येकांतर्गत या योजनेत वृद्धी आणि लाभांश असे दोन पर्यायही असतील. लाभांश पर्यायात- लाभांशप्राप्ती आणि पुनर्गुतवणूक यापकी एक सुविधा असेल, लॉक-इन विना प्रकारात फक्त पुनर्गुतवणूक हाच पर्याय खुला असेल.
एंट्री लोड योजनेच्या कोणत्याही पर्यायावर लागू नाही. इतकेच काय, तीन वर्षांच्या सक्तीच्या लॉक-इन सब-प्लानमध्येही कोणत्याही एग्झिट लोडची वसुली केली जाणार नाही. फंडाच्या प्रारंभिक गुंतवणूक काळात अर्ज भरण्यासाठी किमान गुंतवणुकीची रक्कम ५,००० रुपये अशी आहे.