बहुचर्चित वाहनाच्या नामकरणासह १६ देशांत निर्यातीचा निर्णय
भारतीय प्रवासी वाहन क्षेत्रात अनोखा ‘क्वाड्रीसायकल’ हा चारचाकी वाहन प्रकार सादर करणाऱ्या बजाज ऑटोने हे वाहन प्रत्यक्षात येथील रस्त्यावर न उतरवता विदेशात निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आरई ६०’ नावाने सादर करण्यात आलेल्या वाहनाचे ‘क्युट’ असे नामकरण केले आहे. महिनाअखेपासून विविध १६ देशांमध्ये ते उपलब्ध होईल.
बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज तसेच कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाचे अध्यक्ष राकेश शर्मा यावेळी उपस्थित होते. महिनाअखेरपासून हे वाहन लॅटिन अमेरिका, आफ्रिका, युरोप तसेच आशियात २,००० डॉलरमध्ये (भारतीय चलनात १.३० लाख रुपये) उपलब्ध होईल, अशी माहितीही देण्यात आली.
वाहनाच्या दर्जाविषयी प्रमाणित मानले जाणाऱ्या सर्व युरोपीय अटी हे वाहन पूर्ण करते, असा दावाही शर्मा यांनी केला. वाहनाचे उत्पादन कंपनीच्या औरंगाबाद येथील प्रकल्पात सध्या होत आहे. वाहनाची उत्पादन क्षमता मात्र स्पष्ट करण्यात आली नाही.
बजाज ऑटोने २०१२ मध्ये सर्वप्रथम हे वाहन सादर केले होते. तीन चाकी रिक्षाला पर्याय असलेले हे वाहन बाजारपेठेतील सध्याच्या वाहनांपेक्षा भिन्न वर्गाचे ठरले. त्याच्या परवानगीवरूनच ते वादात सापडले. यानंतर हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
या वाहननिर्मितीसाठी सुरुवातीला रेनो-निस्सानबरोबर भागीदारी करण्यात आली होती. मात्र वाहनाची किंमत तसेच तिच्या बाह्य़रूपावरून मतभेद निर्माण झाल्याने बजाज ऑटोने ते एकटय़ाने विकसित करण्याचे निश्चित केले.
पेट्रोलवर चालणाऱ्या या वाहनामध्ये डीटीएसआय ४ इंजिन बसविण्यात आले असून त्याची इंधन क्षमता ३६ किलो मीटर प्रति लिटर आहे. २०० सीसीचे त्याचे इंजिन वाहनाच्या मागच्या भागात (ऑटो रिक्षाप्रमाणे) असून चार प्रवासी बसण्याची त्यात सोय आहे.