बजाज ऑटोची सर्वाधिक खपाची मोटरसायकल असलेल्या पल्सरची श्रेणी विस्तारित करण्यात आली असून एएस १५० आणि एस २०० गटांच्या दोन दुचाकी मंगळवारी सादर करण्यात आल्या. या वेळी उपस्थित कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी, चालू आर्थिक वर्षांतच पल्सर ४०० ही भारतीय बाजारपेठेत उतरविण्याचे जाहीर केले. कंपनीची पल्सर ही जवळपास दीड दशक जुनी नाममुद्रा आहे.
देशांतर्गत वाहनविक्रीत काहीशा मागे पडलेल्या बजाज ऑटोकरिता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मात्र महत्त्वाची आहे. हे हेरूनच कंपनीने तिच्या दुचाकींसाठी १४ नव्या देशांमध्ये प्रवेश करून देण्याचे निश्चित केले आहे. त्याचबरोबर कंपनीच्या तीन चाकी वाहनांसाठी विविध १२ ते १३ देश ही प्रमुख बाजारपेठ म्हणून विचारात घेण्याचा मनोदय बजाज यांनी या वेळी व्यक्त केला.
बजाज ऑटोने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत ४० देशांमध्ये १८ लाख वाहने निर्यात केली आहेत. कंपनीला गेल्या काही महिन्यांमध्ये नायजेरिया आदी देशांमध्ये कमी मागणीला सामोरे जावे लागले. चलन अस्थिरतेचा हा फटका होता, असे बजाज यांनी याबाबत स्पष्ट केले आहे. कंपनीची एकूण निर्यात मात्र १४ टक्क्यांनी वाढल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.
बजाजच्या पल्सर ४०० चे अनावरण यापूर्वी वाहन मेळ्यात करण्यात आले होते. या गटात कंपनीच्या सध्या २२०, एनएस २००, आरएस २००, १८०, १५० व १३० मोटरसायकल्स आहेत. पहिली पल्सर २००१ मध्ये बाजारात आली. दुचाकी बाजारपेठेत ४३ टक्के हिस्सा राखणारी बजाज ऑटो महिन्याला ६० हजार पल्सर दुचाकी विकते. कंपनीने मंगळवारी सादर केलेल्या दोन्ही मोटरसायकलची किंमत ७९ हजार ते ९१,५५० रुपयांपुढे आहे. पल्सर एएस २०० बरोबरच पल्सर २२० चीही उपलब्धतता कायम राहणार आहे.
दुचाकी निर्यातीसाठी नवी बाजारपेठ शोधणार : राजीव बजाज
बजाज ऑटोची सर्वाधिक खपाची मोटरसायकल असलेल्या पल्सरची श्रेणी विस्तारित करण्यात आली असून एएस १५० आणि एस २०० गटांच्या दोन दुचाकी मंगळवारी सादर करण्यात आल्या.
First published on: 15-04-2015 at 06:57 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj will find out another market for two wheeler exports