‘सार्क’ समूहातील भारत आणि बांगलादेश एकमेकांमधील व्यापारी संबंधांबाबत समाधानी असून आगामी कालावधीतही उभयतांदरम्यान या क्षेत्रातील सहकार्यात वाढ नोंदली जाईल, असा आशावादी दृष्टिकोन बाळगून आहेत. गुंतवणूकपूरक वातावरणामुळे भारतीय कंपन्यांकडून येत्या तीन वर्षांत बांगलादेशातील गुंतवणूक दुप्पट होईल, असा दावा करण्यात येत आहे.
अणुऊर्जा, चलन मुद्रण, वन तसेच संरक्षणवगळता इतर सर्व प्रमुख क्षेत्रांत बांगलादेशात १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला मुभा आहे. सध्या त्या देशात भारताची विविध प्रकल्प, व्यवसाय आदी माध्यमातून २.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक आहे. ती तीन वर्षांत पाच अब्ज डॉलरवर जाईल, असे इंडो-बांग्लादेश चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष मतलूब अहमद यांनी गुरुवारी मुंबईत सांगितले.
याप्रसंगी १८.६५ कोटी डॉलर गुंतवणुकीचे बांगलादेशातील विविध २३ प्रकल्पांबाबत सामंजस्य करारावर उभयतांकडून अहमद यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारतीय औद्योगिक महासंघातर्फे (सीआयआय) आयोजित या व्यवसाय भागीदारी परिषदेदरम्यान संघटनेचे अध्यक्ष के. गोपालकृष्णन हेही उपस्थित होते.

Story img Loader