अपुऱ्या सुविधेने आरोग्यविषयक उपाययोजनांना हरताळ; सरकारच्या लाभार्थी अर्थसाहाय्य हस्तांतरणाने ताणामध्ये भर

वीरेंद्र तळेगावकर

करोना संकटात टाळेबंदीची भर पडली असतानाच अत्यावश्यक सेवेत सहभागी देशातील बँकिंग व्यवस्था कोलमडली आहे. आरोग्यविषयक अपुऱ्या सुविधेअभावी करोनाविरुद्धच्या उपाययोजना करताना बँक कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ  आले आहेत. त्यातच सरकारी अर्थसाहाय्य लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्याचे आव्हान बँकांच्या शाखा तसेच व्यवस्थेसमोर येऊन ठेपले आहे.

करोना संकट उद्भवल्यानंतर लागू झालेल्या टाळेबंदीतही अत्यावश्यक सेवा म्हणून देशातील बँकिंग व्यवस्थेचा समावेश करण्यात आला. परिणामी या कालावधीतही बँकांमध्ये व्यवहार होत आहेत. तुलनेत कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती असणे, कामाचे-व्यवहारांचे विलगीकरण करणे, मास्क-सॅनिटायझरची उपलब्धता, अंतर राखण्याचे बंधन या नियमांची पूर्तता करणे अवघड बनले आहे.

गेल्या दोन दिवसांत बँकिंग व्यवहार मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. आर्थिक वर्ष समाप्तीच्या कामकाजासह आता सरकारच्या अर्थसाहाय्य लाभार्थ्यांची रक्कम हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे.

ठप्प दळणवळणामुळे कर्मचारी शाखेपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण झाल्या असून अपुऱ्या मनुष्यबळात भर पडत असल्याचे एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखाधिकाऱ्याने सांगितले.

करोनाबाधित कर्मचारी आढळला तरच बँक बंद..

करोनाबाधित कर्मचारी आढळला तरच बँक बंद होतील, अशी स्थिती आहे. शाखेतील कर्मचारी अथवा खातेदार करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बँक बंद होण्याचे प्रकार महाराष्ट्रातील गोंदिया, परभणी तसेच इस्लामपूर येथे घडले. अनेक बँकांसमोर खातेदारांच्या लांब रांगा पाहायला आहेत. सरकारी अर्थसहाय्य वितरणामुळे अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.

मास्क, सॅनिटायझर आदींची उपलब्धता रोडावली आहे. गर्दीमुळे खातेदारांशी अंतर राखण्यातही अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक कर्मचारी कामाच्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. याबाबत आम्ही राज्य शासनाकडे सहकार्याकरिता वेळोवेळी पत्रव्यवहारही केला आहे.

– देविदास तुळजापूरकर, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य बँक एम्प्लॉईज फेडरेशन.

बँकांमधील अपुऱ्या मनुष्यबळाच्या समस्येत सद्य:स्थितीत भर पडली आहे. बँक विलीनीकरण, सरकारी अर्थसाहाय्य योजनांच्या अंमलबजावणीचा भार नव्याने आहे. ग्रामीण भागातील शाखांमधील कर्मचाऱ्यांवर लाभार्थी हस्तांतरणाच्या प्रक्रियेचा भार पडणार आहे.

– विश्वास उटगी, माजी सरचिटणीस, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन.

Story img Loader