भारतीय बँकिंग क्षेत्रातील आर्थिक घोटाळे वाढले असून गेल्या दोन वर्षांत तर त्यात तब्बल १० टक्क्य़ांची भर पडल्याचा ठपका ठेवणारा अहवाल सादर झाला आहे. किरकोळ बँकिंगसारख्या क्षेत्रात मोठय़ा प्रत्येक व्यवहारामध्ये १० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. इंटरनेट बँकिंग, एटीएम, इ-बँकिंगमुळे घोटाळ्याचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात येते.
‘डेलॉईट’ या सल्लागार संस्थेने भारतीय बँकिंगविषयीचा अहवाल मुंबईत सादर केला. या अहवालात, गेल्या दोन वर्षांमध्ये बँक घोटाळ्याचे प्रमाण १० टक्क्य़ांनी वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. सर्वाधिक गैरव्यवहार हे मोठा व्यवसाय असलेल्या किरकोळ बँकिंग क्षेत्रात झाला आहे. तर बिगर किरकोळ व्यवसाय क्षेत्रात प्रत्येकी २ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची प्रकरणी घडल्याचे संस्थेचे वरिष्ठ संचालक के. व्ही. कार्तिक यांनी म्हटले आहे.
संस्थेने विविध ४४ खासगी, सार्वजनिक व विदेशी बँकाचा आढावा घेत सादर केलेल्या सर्वेक्षणातील दुसऱ्या टप्प्यात प्रतिसाद देणाऱ्यांपैकी ९३ टक्के सहभागींनी घोटाळ्यात वाढ झाल्याचे मान्य केले आहे. घोटाळ्यात किरकोळ बँकिंग व्यवसायाचा सिंहाचा वाटा राहिला असून सर्वेक्षण सहभागींनी ५० हून अधिक घोटाळे अनुभवल्याचे नमूद केले आहे. अशा प्रत्येक घटनेत १० लाख रुपयांचा तरी गैरव्यवहार झाल्याचे अहवाल नमूद करतो.

Story img Loader