सध्याची बिकट आर्थिक वातावरण लक्षात घेऊन राज्यातील सहकारी बँका, लघू व मध्यम उद्योग तसेच पायाभूत सेवा क्षेत्र यांना सहकार्य करावे, अशा बँकांना सूचना देण्याविषयी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय रिझव्र्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांना आर्जव केले.
मध्यवर्ती बँकेच्या मुख्य पदाची सूत्रे दोनच दिवसांपूर्वी हाती घेतल्यानंतर डॉ. राजन यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जवळपास तासभर चर्चा केली.
राजन यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतानाच मुख्यमंत्र्यांनी या वेळी राज्यातील स्थितीचे वर्णन त्यांच्यासमोर केले.
या अंतर्गत टंचाईमुक्ततेच्या उपाययोजना, विकेंद्रित पाणीसाठय़ाबाबतचे पाऊल आदी निर्णय उलगडले.
सध्याच्या आर्थिक मंदीचा विपरीत परिणाम हा राज्याच्याही अर्थव्यवस्थेवर होत असून सहकार, लघू व मध्यम उद्योग तसेच पायाभूत सेवा क्षेत्रांतील रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने बँक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यास सांगण्याची गरज असून तसे निर्देश नव्या गव्हर्नरांनी द्यावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.