कंपनी आजारी मात्र तिचा प्रवर्तक खुशाल-संपन्न, अशी स्थिती देश सहन सहन करू शकत नाही, अशा शब्दात किंगफिशर एअरलाइन्स आणि तिचे प्रवर्तक विजय मल्ल्या यांचा अप्रत्यक्ष समाचार घेत बँकांनी अशा मंडळींची थकीत कर्जे त्वरित वसुल करावीत, असे निर्देशच केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सोमवारी दिले. राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखांच्या नवी दिल्लीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बुडीत कर्जाचे प्रमाण कमी करण्याच्या दिशेने बँकांनी पावले टाकत कर्ज बुडविणाऱ्यांकडून लवकरात लवकर रक्कम वसुल करावी, असे आवाहनही चिदंबरम यांनी केले. प्रवर्तकांनी अतिरिक्त पैसा उभारावा आणि कंपन्यांनी कर्जफेडीचे कर्तव्य निभावावे, असाही या माध्यमातून विजय मल्ल्या यांचा नामोल्लेख न करता अर्थमंत्र्यांनी सल्ला दिला. बँकांच्या ढोबळ अनुत्पादक मालमत्तेची रक्कम मार्च २०११ मधील ७१,०८० कोटींवरून डिसेंबर २०१२ अखेर १.५५ लाख कोटी रुपयांवर गेली असून यामध्ये कंपन्यांचा हिस्सा ५३.६८ टक्के आहे.
किंगफिशर कर्जवसुलीसाठी सर्वतोपरी प्रयत्न : स्टेट बँक
किंगफिशर एअरलाइन्सकडील थकीत कर्ज वसूल करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलली जातील, असे भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी सांगितले. किंगफिशरला दिलेल्या कर्जाच्या बदल्यातील हमी त्वरित विलग कशी करता येईल, याबाबत आम्ही विचार करत असून तारण म्हणून ठेवलेले समभाग, मालमत्ता आदींचा लिलाव करण्याचा पर्यायही बँकेसमोर असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील विविध १७ बँकांचे विजय मल्ल्या यांच्या किंगफिशरकडे ७,००० कोटी रुपयांचे कर्ज थकलेले आहे. याबदल्यात युनायटेड स्पिरिट्सचे समभाग, किंगफिशरचा ब्रॅण्ड, कंपनीच्या मालकीची निवासी तसेच वाणिज्य मालमत्ता बँकांकडे तारण आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा