तुम्हीच तुमचे निर्णयकर्ते बना; स्वत:ला जे योग्य वाटेल तेच करा, असाच कानमंत्र मावळते अध्यक्ष रतन टाटा यांचा उद्योगसमूहातील त्यांचे नियोजित वारसदार सायरस मिस्त्री यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपविताना राहील. रतन टाटा येत्या २८ डिसेंबर रोजी आपल्या ७५ व्या वाढदिवशी टाटा उद्योगसमूहात व्यतीत केलेल्या ५० वर्षांच्या कारकीर्दीनंतर निवृत्ती स्वीकारत आहेत.
भारतातच नव्हे तर जगातील एक सर्वात आदरणीय आणि प्रभावशाली उद्योगधुरीण असलेले रतन टाटा यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत निवृत्तीपश्चात त्यांच्या कतृत्त्व व प्रतिमेचे कसलेही ओझे त्यांचे वारसदार सायरस मिस्त्री यांच्यावर नसावे, अशी प्रांजळ कबुली दिली. ‘कुणावरही त्यांच्या पूर्वसूरींची कसल्याही प्रकारची सावली पडलेली असणे मला योग्य वाटत नाही,’ अशा शब्दांत टाटा यांनी निवृत्तीपश्चात त्यांच्या प्रतिमेचा समूहाच्या कारभारावर प्रभाव टिकून राहील या धारणेचे निवारण केले. लवकरच त्यांची जागा घेत असलेल्या मिस्त्री यांच्यासाठी काही यशमंत्र सांगाल काय, या प्रश्नावरही ‘जेव्हा जेआरडी टाटा यांच्याकडून माझ्याकडे कारभार आला तेव्हा मी स्वत:ला समजावून सांगितलेल्या गोष्टीच मी त्यांना सांगेन,’ असे टाटा यांनी प्रांजळ उत्तर दिले.
या मुलाखतीत पुढे बोलताना टाटा म्हणाले, ‘जेआरडींसारखेच मी वागावे, निर्णय घ्यावे, अशीच सर्वजण अपेक्षा करीत होते. परंतु मी सत्वर स्वत:ला बजावून सांगितले की, मला ते जमणार नाही. मी कितीही नक्कल करायची ठरविले तरी मला त्यांच्यासारखे बनता येणार नाही. म्हणून मग मला जे योग्य वाटेल तेच मी करेन असे मी ठरविले. सायरसलाही मी हेच करण्यास सांगितले आहे.’
उपाध्यक्ष पदावरून अध्यक्षपदाकडे संक्रमण म्हणून सायरस मिस्त्री हे जवळपास वर्षभर टाटा यांची साथसंगत करीत आहेत. या काळा त मिस्त्री यांच्याकडून ‘हे बरोबर, ते ठीक आहे काय?’ असे वेळोवेळी विचारले गेले. पण या प्रश्नांना प्रतिसाद म्हणून ‘मी जर या ठिकाणी नसेन त्या स्थितीत, तुम्हीच तुमचे निर्णयकर्ते असाल’ अशा नजरेने पाहण्याचा सल्ला आपण त्यांना देत आलो असल्याचे टाटा यांनी स्पष्ट केले. ‘तुमचा प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक चालीची सार्वजनिक चिकित्सा होणार हे लक्षात घ्या. या कसोटीवर कोणती गोष्ट जर खरी ठरत असेल तर करावी आणि नसेल तर करू नये, हाच आपल्या आजवरच्या निर्णयक्षमतेचा निकष राहिला आहे. हेच माझे सायरसलाही सांगणे आहे,’ असे टाटा यांनी सांगितले.
निवृत्तीपश्चात आपण आठवडा- दोन आठवडय़ातून एकदा जेवणासाठी नियमितपणे भेटणार असून, त्या दरम्यान त्यांना माझ्याकडून हवे असलेली मदत-मार्गदर्शन दिले जाईल, असा खुलासाही टाटा यांनी केला. निवृत्तीनंतरही टाटांच्या वेगवेगळ्या विश्वस्त संस्थांचे अध्यक्षपद रतन टाटा यांच्याकडे राहणार असून, टाटा सन्सचा ६६ टक्के मालकी हिस्सा या विश्वस्त संस्थांकडेच आहे. त्यामुळे टाटा समूहावर त्यांचा प्रभाव अप्रत्यक्षपणे कायम राहणार नाही काय, या प्रश्नाचेही रतन टाटा यांनी अगदी साधेपणाने उत्तर देताना सांगितले की, ‘त्या समयी माझी भूमिका आणि अभिप्राय कंपन्यांचा अध्यक्ष या नात्याने नसेल तर या कंपन्यांच्या अन्य भागधारकांप्रमाणेच एका भागधारकासारखीच असेल. कंपन्यांचा कारभार, त्यांचा वृद्धीपथ वगैरेत सहभागापेक्षा भागधारक म्हणून मला परतावा किती मिळेल हाच माझ्या त्यावेळी जिव्हाळ्याचा विषय असेल. टाटा सन्सकडून मिळणारा लाभांश हाच या विश्वस्त संस्थांच्या उत्पन्नाचा स्रोत आहे आणि त्यायोगेच या संस्थांकडून धर्मादाय कार्य चालते. हे उत्पन्न वाढते राहील हे माझ्याकडून नक्कीच पाहिले जाईल.’
तुमचा प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक चालीची सार्वजनिक चिकित्सा होणार हे लक्षात घ्या. या कसोटीवर कोणती गोष्ट जर टिकाव धरत असेल तर करावी आणि नसेल तर करू नये, हाच आपल्या आजवरच्या निर्णयक्षमतेचा निकष राहिला आहे आणि हेच माझे सायरसलाही सांगणे आहे.

Story img Loader