कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. ज्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले जात आहे त्याचा बँक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचाही काडीचाही संबंध नाही, असा दावाही यानिमित्ताने करण्यात आला आहे. सरकारविरोधी धोरणाचा निषेध मागण्यांसाठी तसेच आपल्या विविध मागण्यांसाठी ११ संघटनांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनांनी बुधवारपासूनचा दोन दिवसांचा बंद पुकारला आहे. यामध्ये बँक कर्मचारी, अधिकारी वर्गाचे नेतृत्व करणाऱ्या विविध ४ संघटनाही सहभागी आहेत. याबाबत केंद्रीय अर्थखात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अन्य कामगार संघटनांनी केलेल्या मागण्यांमध्ये बँकांशी निगडित कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही मागण्या नाहीत. त्यामुळे बँक संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होऊ नये. बँका या मोठय़ा प्रमाणातील रोजगारनिर्मितीत भर घालत असतात, असे नमूद करून बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही सामाजिक सुरक्षाकवच प्रदान केले आहे, याची आठवण या निवेदनातून केली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही निवृत्तवेतन आहे तसेच बँक कर्मचाऱ्यांचे वेतनही आकर्षक आहे, असेही या निवेदनात स्पष्ट केले आहे.

Story img Loader