महिनाअखेर होऊ पाहणारी लूप मोबाइल आणि भारती एअरटेल विलीनीकरण प्रक्रिया आता रद्द झाल्यागत जमा आहे. दूरसंचार नियामकाकडे विलीनीकरणाची प्रक्रिया प्रलंबित असताना एअरटेलने मात्र हा व्यवहार संपुष्टात आणला आहे.
या दरम्यान लूप मोबाइलच्या १५ लाख ग्राहक तसेच कंपनीच्या २०० हून अधिक कर्मचाऱ्यांवर मात्र संकट कोसळले आहे. महिनाअखेर होणाऱ्या या विलीनीकरण प्रक्रियेपूर्वीही लूपधारकांना संपर्क तसेच देयकाबाबत मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबईतील मोबाइल सेवा पुरवठादार कंपनी म्हणून लूप मोबाइल ओळखली जाते. २० वर्षांपूर्वी आर्थिक राजधानीत टूजी तंत्रज्ञानावर सेवा देणाऱ्या या कंपनीचे ३० लाखांहून अधिक ग्राहक होते.
लूप मोबाइल ७०० कोटी रुपयांना खरेदीचा निर्णय एअरटेलने मार्चमध्ये जाहीर केला होता. मात्र अतिरिक्त देणीमुळे एअरटेल हा व्यवहार पूर्ण करू शकत नव्हती. परिणामी कंपनीची ग्राहकसंख्याही १५ लाखांवर येऊन ठेपली.
दूरसंचार नियामकाकडे प्रलंबित असलेल्या लूप मोबाइलच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता मिळत नसल्याने हा व्यवहार संपुष्टात आणला जात असल्याचे कळते. निश्चित विक्री रकमेव्यतिरिक्त सरकार दफ्तरी पैसे कुणी भरायचे यावरून उभय कंपन्यांमध्ये वाद सुरू होता.
नव्या परवान्याच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी न होणाऱ्या लूप मोबाइलचा दूरसंचार परवाना २९ नोव्हेंबरमध्ये संपत असून याबाबत कंपनीने आपल्या ग्राहकांना सूचित करण्याचे आदेश दूरसंचार नियामकाने दिले होते. कंपनीने दूरसंचार विभागाला अतिरिक्त ‘पोर्टिग कोड’ पुरविण्याची मागणीही केली आहे.
लूप मोबाइलला खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने ३५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते; पैकी अद्याप २१५ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. दरम्यान लूप मोबाइल कंपनीची ग्राहकसंख्या आता जवळपास निम्मी झाली आहे.
‘लूप’धारकांचा त्रास संपेना..
लूप मोबाइल भारती एअरटेलमध्ये विलीन होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच कंपनीच्या मोबाइलधारकांमध्ये मात्र कंपनी बंद होण्याची शंका होती. त्यातच नेटवर्कच्या तक्रारी सुरू झाल्या. कंपनी बंद होणार म्हटल्यावर विद्यमान देयक भरण्यासाठी तसेच ‘पोर्टिग’ करण्यासाठी आवश्यक असलेला ‘कोड’ मिळविण्यातही अडचण येऊ लागल्या. देयक भरणारी कंपनीची दालने टप्प्या-टप्प्याने बंद होऊ लागली. तेथील कर्मचारी तसेच इतर सुविधाही कमी होत गेली. ‘पोर्टिग’साठी (क्रमांक तोच ठेवूून सेवा बदलण्याची सुविधा) विद्यमान देयक भरूनही लूपधारकांची सेवा मात्र नव्या पुरवठादारांकडे हस्तांतरित होत नव्हती. विद्यमान देयक भरले तरी ‘पोर्टिग’ होईपर्यंतच्या (सात ते दहा दिवस) कालावधीतील देयकाची अग्रीम रक्कम भरल्याचा सल्ला दिला जाई. तसे करूनही अद्याप अनेक लूपधारक नव्या सेवेपासून वंचितच आहेत. कंपनीची दालने तसेच टोल फ्रीवरील सेवाही बंद झाली आहे. अनेक लूपधारकांना अन्य सेवा पुरवठादारांच्या क्रमांकावर केलेले कॉल तसेच एसएमएसही पूर्ण होन नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत लूपने ‘इंटरकनेक्टिंग’ शुल्क भरले नसल्याचे कारण दिले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा