देशातील आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी ‘भारती एअरटेल’ने वाढत्या खर्चाशी तोंडमिळवणी करताना कॉल दरात वाढीचे आणि सवलतीच्या कॉल्सची मिनिटे घटविण्याचे स्पष्ट संकेत दिले. बाजार अग्रणी असल्याने एअरटेलच्या दरवाढीचे अन्य मोबाइल सेवा प्रदात्यांकडूनही अनुकरण होणे अपेक्षित आहे.
भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी (भारत व दक्षिण आशिया) गोपाल विठ्ठल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘‘आजवर आम्ही कॉल दरात वाढीच्या निर्णयापासून फारकत घेत आलो आहोत, मात्र आता ठोस निर्णय घेण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. सध्याच्या घडीला असलेली दररचना ही संपूर्णपणे अव्यवहार्य असून, विविध प्रकारच्या खर्चाची मात्रा वाढत चालली आहे.’’
सलग १५ तिमाहीत नफ्यात घसरणीची आर्थिक कामगिरी नोंदविणाऱ्या भारती एअरटेलने, ८६ टक्क्य़ांच्या भरीव वाढीसह ९६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावणारी जाने-मार्च २०१४ तिमाहीची दमदार कामगिरी मंगळवारी जाहीर केली. मात्र या नफावाढीत एअरटेलच्या डेटा (मोबाइल इंटरनेट) व्यवसायाचे योगदान सर्वाधिक राहिले असून, ध्वनी सेवेतून अपेक्षित लाभ मात्र गाठता आला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
डिझेलच्या दरात वाढ, नेटवर्क चालविण्याचे आणि सेवा जाळ्यात विस्ताराचा खर्च, ध्वनिलहरी परवाना शुल्कातील वाढ, फायबर तारांच्या वाढलेल्या किमती अशा सर्वागाने खर्चाचे प्रमाण वाढत चालले असल्याने सवलतीच्या कॉल्सची मात्रा घटविण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे विठ्ठल यांनी सांगितले.
एअरटेलने अलीकडे आपल्या इंटरनेट तसेच ध्वनी सेवांच्या विशिष्ट योजनांचे शुल्क वाढविले आहे आणि गत तीन-चार तिमाहींपासून ग्राहकांच्या ‘मोफत’ नजराण्यांनाही कात्री लावत आणली आहे. परिणामी सरलेल्या तिमाहीत एअरटेलच्या ध्वनी सेवेत प्रति मिनिट उत्पन्नाचे प्रमाण हे ३५ पैशांवरून ३७.०७ पैसे असे उंचावले आहे.
स्पर्धेचा घाव
भारताची दूरसंचार बाजारपेठ स्पर्धात्मक नव्हे तर अति-स्पर्धात्मक आहे. जेथे १०-१२ सेवा प्रदात्यांकडून सेवा दिली जात आहे. अशी भारताचा अपवाद करता जगाच्या पाठीवर कोणतीही बाजारपेठ नसेल, परंतु अल्पावधीतच बाजारपेठेत दृढता येईल आणि कदाचित पाच-सहा सेवा प्रदातेच तग धरू शकतील.