प्राथमिक भांडवली बाजाराची मरगळ वर्ष २०१२ सरतासरता संपण्याची चिन्हे आहेत. आर्थिक सुधारणांकडे डोळे लावून बसलेल्या मुंबई शेअर बाजाराची वाटचाल १८,५०० च्या पुढे सुरू असतानाच, प्राथमिक भागविक्रीच्या रुपातील गेल्या दोन वर्षांतील सर्वात मोठय़ा भांडवल उभारणीचा बार ‘भारती इन्फ्राटेल’ या कंपनीकडून उडविला जाणार आहे.
देशातील पहिल्या क्रमांकाची मोबाईल सेवा प्रदाता भारती एअरटेलच्या पायाभूत सेवा क्षेत्रातील उपकंपनी ‘भारती इन्फ्राटेल’ डिसेंबर महिन्यात भांडवली बाजारात धडक देणार आहे. शेअर बाजारातील गेल्या दोन वर्षांतील ही सर्वात मोठी भागविक्री ठरेल. कंपनीला भागविक्रीतून ५ हजार कोटी रुपयांचे भांडवल उभारले जाणे अपेक्षित आहे. जाणकारांच्या मते समभागाचे प्रत्येकी मूल्य २५० रुपयांपेक्षा कमी असेल. जवळपास याच किमतीला डिसेंबर २००७ मध्ये काही बडय़ा गुंतवणूकदारांनी कंपनीतील १३.९ टक्के हिस्सा एकूण १.२५ अब्ज डॉलरच्या मोबदल्यात खरेदी केला होता. यंदा १८ ते २० कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये भारती एअरटेलच्या काही नव्या समभागांसह चार खाजगी गुंतवणूक कंपन्यांच्या समभागांचीही विक्री होणार आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१० मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडियाची प्रारंभिक भागविक्री झाली होती. या माध्यमातून १५,२०० कोटी रुपये उभारले गेले होते. यानंतर या प्रक्रियेबाबत बाजार तसा नरमच होता. इतकेच नव्हे तर जानेवारी २०११ पासून तर तब्बल ५१ कंपन्यांनी आपल्या मनसुब्यांना मुरड घालताना, भागविक्रीपासून माघार घेणे पसंत केले. पैकी २० कंपन्यांची भागविक्री विद्यमान २०१२ मध्ये होणार होती.
भारतीने प्रस्तावित भागविक्रीसाठी  १५ सप्टेंबर रोजी सेबीकडे प्रस्ताव सादर केला होता. भारती इन्फ्राटेलमध्ये प्रमुख प्रवर्तक कंपनीचा ८६.०९ टक्के हिस्सा आहे. तो या प्रक्रियेनंतर ७९.४२ टक्क्यांवर येऊ शकेल. टॅमसेक होल्डिंग, गोल्डमॅन सॅक्स, अ‍ॅनेडेल आणि नोमुरा या चार खाजगी गुंतवणूकदार कंपन्यांचा मिळून भारती इन्फ्राटेलमधील असलेला १३.९१ टक्के हिस्सा भागविक्रीनंतर १० टक्क्य़ांवर येईल. कंपनीचे देशभरात ३३,६६० मोबाईल टॉवर आहेत. इंडस टॉवर्स या अन्य कंपनीत भारती इन्फ्राटेलचा ४२ टक्के हिस्सा आहे. इंडस टॉवर्स ही १.१० लाख टॉवर्ससह देशातील सर्वात मोठी दूरसंचार पायाभूत सेवा प्रदाता कंपनी आहे. त्यामध्ये भारती, व्होडाफोन आणि आयडिया या दूरसंचार सेवा कंपन्या भागीदार आहेत.    

Story img Loader