नेत्र निगा क्षेत्रामध्ये गेल्या तीन दशकांपासून दक्षिणेत प्राबल्य असलेल्या शंकरा नेत्र निगा संस्थेने अधिक व्यावसायिक होत देशाच्या आर्थिक राजधानीत पाऊल ठेवले आहे. ‘व्हिजन २०२०’अंतर्गत प्रत्येक राज्यात अस्तित्व निर्माण करण्याच्या उद्देशाने संस्थेचे मालाड (पश्चिम) येथील सशुल्क अद्ययावत नेत्र रुग्णालय येत्या रविवारी सुरू होत आहे.
शंकरा नेत्र निगा संस्थेमार्फत १९७७ पासून दक्षिणेत आतापर्यंत १० लाख नेत्र शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर आता मुंबईत भोजराज चानराई शंकरा नेत्र रुग्णालय स्थापन केले आहे. १२ हजार चौरस फूट क्षेत्रफळातील या रुग्णालयात दिवसाला ५०० रुग्ण येण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. संस्था मुंबईतच येत्या सहा महिन्यांत मोफत नेत्र निगा केंद्रही सुरू करणार आहे.
संस्थेचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. आर. व्ही. रमणी यांनी सांगितले की, २०२० पर्यंत आणखी २० नेत्र निगा रुग्णालय सुरू करण्यात येणार असून आणखी १० लाख रुग्णांच्या सेवेचे उद्दिष्ट राखण्यात आले आहे.
आगामी टप्प्यात राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगढ, बिहार या राज्यांमध्ये विस्तार करण्यात येणार असून येत्या सात वर्षांत देशातील प्रत्येक राज्याच्या राजधानीत संस्थेच्या पाऊलखुणा असतील, असेही ते म्हणाले.
मुंबईच्या रूपात संस्थेचे देशातील हे १४वे रुग्णालय असून येथे अनेक तज्ज्ञ वैद्यक अधिकारी तसेच उपचारासाठी उच्च तंत्रज्ञानाची उपकरणे असल्याचे या वेळी भोजराज चानराई शंकरा नेत्र रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश राणे यांनी सांगितले.
संस्था मुंबईत २२५ खाटांची क्षमता असलेले मोफत नेत्र निगा रुग्णालय सुरू करण्यासाठी जागेची चाचपणी करत असून येत्या सहा ते आठ महिन्यांत या कामालाही प्रत्यक्षात वेग येईल, असा विश्वास संस्थेच्या भारतातील विपणन व व्यवसाय विभागाचे प्रमुख सेथुमहादेवन यांनी व्यक्त केला.
नेत्र निगा क्षेत्रात खासगी कंपन्यांची स्पर्धा वाढत असताना संस्थेने मुंबईतील रुग्णालयातील सेवा २५ टक्के स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्याचा दावा केला आहे. संस्थेला एक रुग्णालय उभारणीस १५ ते ३० कोटी रुपये खर्च येतो. संस्था एकूण नेत्र शस्त्रक्रियेपैकी ८० टक्के या गरिबांसाठी मोफत करते.