सरलेल्या २०१२ सालात सेन्सेक्स आणि निफ्टी या आपल्या बाजाराच्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी जवळपास २६ टक्क्यांचा परतावा गुंतवणूकदारांना दिला. त्या तुलनेत जागतिक भांडवली बाजारांमध्ये सरासरी १५ टक्क्यांची सुधारणा दिसली आहे. रुपया सतत कमजोर बनलेला असताना भारतीय बाजारांची ही कामगिरी दुष्ट लागण्याजोगी आहे. विदेशी वित्तसंस्थांनी सरत्या वर्षांत बाजारात केलेली खरेदी हा एक विक्रमच आहे. केवळ प्रारंभिक भागविक्री (आयपीओ) हा घटक आपल्यासाठी निराशेचा राहिला आहे आणि तेथेच खरी गोम आहे.
बाजाराची २०१३ सालाची धमाकेदार सुरुवात पाहता, या संपूर्ण वर्षांबद्दल बऱ्याच अपेक्षांचे मोठमोठे पूल आताच बांधले जात आहेत. विकसित देशात जशी पुलांवरून जाणाऱ्या पुलांची रचना असते तसेच हे काहीसे आहे. अपेक्षांचे काही पूल तर पार २४,००० अंशांच्या कळसाची उंची गाठणारे आहेत, तर काही त्या खालून जाणारे आहेत. पण एकंदर सूर आशादायी आहे. अपेक्षांच्या या भारंभार ओझ्याखाली पावले जड होऊन बाजाराचा प्रवास मंदावला तर मात्र नवल ठरू नये.
एकूणात शेअर बाजार हा उत्तरोत्तर अस्सल अर्थव्यवस्थेबाबत असंवेदनशील बनला आहे काय अशा शंकेलाही वाव मिळत आहे. जगातील सर्वोत्तम कामगिरी करणारे शेअर बाजार असलेला देश जागतिक स्तरावरील गतिशील अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत ४० व्या पायरीवर आहे. या सूचीत सिंगापूर अव्वलस्थानी आहे, तर त्या खालोखाल फिनलंड, स्वीडन, इस्रायल वगैरे देश आहेत. सिंगापूरवगळता अन्य देश भांडवली बाजारांसाठी परिचित नाहीत.
मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप हा सरत्या सालाचा ‘फ्लेव्हर’ चालू वर्षांतही बाजारात टिकाव धरून आहे. सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भावातही उत्साहवर्धक हालचाल दिसून येणे हे सुरुवातीच्या काही दिवसांतील व्यवहारांचे लक्षणीय वैशिष्टय़ म्हणता येईल. व्याजदर कपातीचा संभाव्य मुहूर्त गाठणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण पंधरवडय़ावर येऊन ठेपले आहे. त्या बाबत वाढलेल्या आशेने सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी स्टेट बँकेसह अनेक बँकांनी व वित्तसंस्थांनी ५२ आठवडय़ांतील उच्चांकांपल्याड मजल मारली आहे. बँकांच्या व्याजदरांबाबत संवेदनशील असलेल्या स्थावर मालमत्ता व बांधकाम कंपन्यांच्या समभागांमध्ये दिसणारी भाववाढही त्या कारणानेच असल्याचे दिसून येते. या शिवाय धातू कंपन्यांच्या शेअर्सबाबत लोकांचे आकर्षण वाढले आहे. नैसर्गिक रबराच्या किमती ओसरल्याने टायर कंपन्यांची नफाक्षमता सुधारेल या कयासाने त्यांनाही बाजारात उत्तरोत्तर मागणी वाढत आहे. वाहनांच्या विक्रीचे डिसेंबरचे आकडय़ांमध्ये किंचितशी सुधारणाही बाजारातील उत्साह दुणावणारीच ठरली आहे. बजाज ऑटो आणि हीरो मोटोकॉर्पमध्ये पुन्हा खरेदीला जोर चढला आहे. भारतीयांचा सोने-हव्यास ही आपली डोकेदुखी धोरणकर्ते व रिझव्‍‌र्ह बँकेसारख्या वित्तीय नियंत्रकांनी लपविलेली नसली तरी गुंतवणूकदारांची सोन्याकडील ओढ तसूभरही कमी होताना दिसत नाही. टीबीझेड, तारा आणि पीसी ज्वेलर्सच्या भागविक्रींना (आयपीओ) मिळालेला प्रतिसाद व शेअर्सची लिस्टिंगनंतर निरंतर सुरू असलेली मुसंडी याचा प्रत्यय देते.
अमेरिकेतील सकारात्मक घडामोडींच्या परिणामी  नव्या वर्षांत सुरू झालेला निर्देशांकांचा धडाका येणाऱ्या आठवडय़ांत टिकून राहील. किंबहुना २९ जानेवारीपर्यंत म्हणजे रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण प्रस्तुत केले जाईपर्यंत बाजारातील चैतन्य असेच टिकून राहणे अपेक्षित आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे धोरण अपेक्षेप्रमाणे आले तर पुढचा टप्पा हा फेब्रुवारीअखेर येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा असेल. गुंतवणूकदारांनीही अशा अल्पकालीन टप्प्यातच आडाखे बांधून आपल्या गुंतवणुकीची दिशा ठरविल्यास ते सद्य वातावरणात उपयुक्त ठरेल.
शिफारस : दीर्घकालीन खरेदीसाठी महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र फायनान्शियल्स उत्तम वाटतो. मागे सुचविलेला श्रेई इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्शियलने रु. ५०ची मजल गाठली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा