ई-व्यापाराच्या नव्या ग्राहकांच्या वाढत्या पसंतीला अनुसरून आता मोबाइल फोन्स, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, कपडेलत्तेच नव्हे, तर चार भिंतीच्या घराचीही ऑनलाइन खरेदी शक्य होणार आहे. आता तर ‘इंडियाप्रॉपर्टी डॉट कॉम’ने नामांकित १२५ विकासकांच्या देशभरातील २०० हून अधिक प्रकल्पांच्या जंगी सेलचे ऑनलाइन आयोजन केले असून, खरेदीदारांना आकर्षक सवलती आणि बक्षिसेही देऊ केली आहेत.
मंगळवार, १७ मार्चपासून आठवडाभर सुरू राहणाऱ्या या ऑनलाइन विक्रीतून मुंबई (एमएमआर क्षेत्र), पुणे, दिल्ली एनसीआरसह देशातील आठ प्रमुख शहरांमधील सदनिकांसह, जमीन व भूखंडांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनाही उत्तम संधीचे दालन खुले केले आहे, असा विश्वास इंडिया प्रॉपर्टीचे (Indiaproperty.com) मुख्याधिकारी गणेश वासुदेवन यांनी सांगितले. घरबसल्या डेस्कटॉप अथवा स्मार्ट फोनवर इच्छित ठिकाणी पसंत केलेल्या प्रकल्प आणि हव्या त्या घराचा शोध ग्राहकांना घेता यावा यासाठी ‘ट्रू व्ह्य़ू’ नावाची या संकेतस्थळाने वापरलेली तंत्रज्ञान प्रणालीही उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय या कालावधीत बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना त्या त्या विकासकाने देऊ केलेल्या आकर्षक डील्स आणि हॉलीडे पॅकेज, मॉडय़ुलर किचन्स, फर्निचर व फर्निशिंग्स अशी बक्षिसेही जिंकता येणार आहेत.

Story img Loader